खोटा बनाव केल्याचे उघडकीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोटा बनाव केल्याचे उघडकीस
खोटा बनाव केल्याचे उघडकीस

खोटा बनाव केल्याचे उघडकीस

sakal_logo
By

पोलिस हवालदारासह चौघांवर गुन्हा दाखल

खोटा अपघात दाखवून विम्याचे ५० लाख उकळण्याचा प्रयत्न

पेठवडगाव, ता. ९ : खोटा अपघात दाखवून विमा कंपनीकडून ५० लाख रुपये वसूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिस हवालदारासह चौघांच्यावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलिस हवालदार रमेश भैरू कुंभार, उर्मिला राकेश भारती (रा. भादोले), आप्पासाहेब मलगोंडा पाटील (रा. पट्टणकोडोली), धनाजी दत्तात्रय बिडकर (रा. कसबा बीड, ता. करवीर) यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भादोले (ता. हातकणंगले) डॉ. राकेश दिनकर भारती मोटारसायकलवरून २० ऑक्टोबर २०१९ रोजी भादोले-वाठार रस्त्याने जात असताना मोटारसायकल खड्ड्यात जाऊन गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताचा तपास अमलदार रमेश कुंभार यांच्याकडे होता. डॉ. भारती यांचा वाहन परवाना, विमा नव्हता. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणार नाही म्हणून श्रीमती उर्मिला भारती यांनी पोलिस अमलदार कुंभार यांच्या मदतीने अप्पासाहेब पाटील यांची दुसरी मोटारसायकल अपघातात दाखवून ती धनाजी बिडकर चालवतो आहे, असे दाखविले व तशी कागदपत्रे केली. या मोटारसायकलने पाठीमागून ठोकरल्यामुळे अपघात झाल्याची खोटी कागदपत्रे दाखवली. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे धनाजी बिडकर यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
याबाबत टाटा.ए.आय.जी विमा कंपनीकडे ५० लाखांचा दावा दाखल केला. विमा कंपनीस संशय आल्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल केली. या याचिकेनुसार गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे अन्वेषणचे पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीमती भाग्यश्री पाटील, पोलिस निरीक्षक श्रीमती वर्षा कावडे यांनी तपास केला. तपासात खोटा अपघात दाखल झाल्याचे व खोटा बनाव केल्याचे उघडकीस आले. याबाबत पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.