एक गाय व कुत्रयास ठार मारले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक गाय व कुत्रयास ठार मारले
एक गाय व कुत्रयास ठार मारले

एक गाय व कुत्रयास ठार मारले

sakal_logo
By

मौजे तासगावला बिबट्याचा वावर

दोन प्राण्यांचा घेतला बळी; पकडण्याची मागणी

पेठवडगाव, ता. २९ : मौजे तासगाव (ता. हातकलंगले) येथील सिद्धोबाच्या डोंगर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. या बिबट्याने काही दिवसांपूर्वी एक गायीचे खोंड व कुत्र्याला ठार केले आहे. यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्यास पकडण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
मौजे तासगाव येथील महेश पाटील यांची गोसंजीवनी गोशाळा आहे. या गायीच्या गोठ्यात सुमारे शंभर गिर व देशी गायींचे पालन केले जाते. एक महिन्यापूर्वी मध्यरात्री बिबट्याने त्यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार मारले. या घटनेची कल्पना त्यांनी वन विभागास दिली. त्यानंतर वन विभागाचे काही लोक येऊन पाहणी करून गेले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री पुन्हा बिबट्याने गायींवर हल्ला करून दोन वर्षांचे खोंड तोंडात धरून ओढत नेले. यावेळी मुक्कामास असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बिबट्यास प्रत्यक्ष पाहिले. दुसऱ्या दिवशी गोठ्यापासून पाचशे मीटर अंतरावर खोंड मृत अवस्थेत पडलेले होते. या गायीच्या खोंडाचा नरड्यावर घाव होते व पोटाचा काही भाग खाल्लेल्या अवस्थेत होता.
दरम्यान, या घटनेची कल्पना वनविभागास पाटील यांनी दिली. त्यानंतर वन विभागाचे काही कर्मचारी घटनास्थळी येऊन पाहणी करून गायीच्या मृत खोंडाजवळ कॅमेरे बसवून गेले. या कॅमेऱ्यामध्ये बिबट्याचे छायाचित्र कैद झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे तासगाव परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण असून, वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
-----------
चौकट
पकडण्याची मागणी
या सिद्धोबाच्या डोंगरावर अनेक तरुण व्यायाम करण्यास दररोज पहाटे येतात. याशिवाय गवताचे कुरण असल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. काही दिवसांपूर्वी डोंगरावरील सिद्धोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या एकास बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे बिबट्यास पकडण्याची मागणी होत आहे.