
वर्गमित्रांकडून सामाजिक पायंडा
01855
----------
वर्गमित्रांकडून सामाजिक पायंडा
मित्राच्या निधनानंतर कुटुंबास वर्गणी जमवून ९० हजारांची मदत
पेठवडगाव, ता. ४ : मित्राचे अचानक निधन झाले. त्याच्या घरातील कुटुंबीयांवर संकट कोसळले. व्हॉटसॲपच्या माध्यमातून वर्गमित्रांनी एकत्रित येऊन वर्गणी जमवून त्या कुटुंबास नव्वद हजाराची आर्थिक मदत करून एक नवीन सामाजिक पायंडा पाडला. त्यांचे समाजातुन कौतुक होत आहे.
मौजे तासगाव (ता. हातकणंगले) येथील सुतार कुटुंबातील बाबासो सुतार हा घरातील कर्ता होता. त्याच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले. ही घटना वर्गमित्रांना समजली. वडगाव विद्यालयाच्या १९९४ ची दहावीच्या वर्गात शिक्षण घेतलेल्या मित्रांनी व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून बाबासो सुतार यांच्या कुंटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत सर्व वर्गमित्र एकत्रित आले. त्यांनी नव्वद हजार रुपये जमा केले.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रविवारी (ता. १) बाबासो सुतार यांच्या मौजे वडगाव येथील घरी सर्व मित्र जमले. त्यांनी पत्नी गीताजली यांच्याकडे ठेव पावती सुपूर्द केली. या वेळी आई सावित्री, वडील रामदास, मुलगा नितीन, मुलगी सिद्धी, भाऊ दीपक, चुलतभाऊ प्रदीप सुतार, कृष्णात पाटील, म्हाडाचे अभियंता विक्रम निंबाळकर, प्रा. अमित बेलेकर, मोहन बेलेकर आदी उपस्थित होते.
----------
सामाजिक बांधीलकी जपली
वडगाव हायस्कूलमधील १९९४ च्या या वर्गमित्रांनी एकत्रित येऊन अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये पूरग्रस्तांना पाणी, अन्नधान्य किट, जनावरांना चारा देण्याचे काम केले आहे. याशिवाय कोरोनात वडगाव पालिकेस पीपीई किट वाटप केले. वडगाव हायस्कूलमध्ये शौचालय बांधकामासाठी भरीव निधी देऊन वेगळी सामाजिक बांधीलकी जपली आहे.