
मोबाईल, टीव्ही बंदचा निर्णय ऐतिहासिक
01906
----
मोबाईल, टीव्ही बंदचा निर्णय ऐतिहासिक
आमदार प्रा. जयंत आसगावकर; वडगावमध्ये शिवजयंतीनिमित्त प्रारंभ
पेठवडगाव, ता. १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वडगावनगरीने दीड तास मोबाईल व टीव्ही बंदचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. या निर्णयाची अमलबजावणी राज्यात व्हावी. यासाठी प्रयत्नशील रहाणार आहे. तसे झाल्यास येणाऱ्या पिढीच्या दृष्टीने दिशादर्शक निर्णय ठरेल, असे प्रतिपादन आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी केले.
येथील आम्ही वडगावकर यांच्यावतीने शिवजयंती निमित्त वडगाव शहरात दीड तास टी. व्ही. व मोबाईल बंद प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, पोलिस निरिक्षक भैरव तळेकर, मुख्याधिकारी सुमित कदम, माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात पालिका चौकातुन प्रबोधनात्मक रॅलीने झाली. बळवंतराव यादव हायस्कूल, मराठी शाखा यांच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. प्रा. भरत उपाध्याय यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली.
विद्याताई पोळ म्हणाल्या, ‘छ.शिवाजी महाराजांची जयंती ही एका दिवसापुरती मर्यादीत ठेवली नसली पाहिजे. यासाठी त्यांचे विचार, आचार यांचे पालन करुन आदर्श पिढी बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. शहरातील तब्बल पाच हजार नागरिकांनी संकल्पपत्र व शपथ घेवून उपक्रमास प्रतिसाद दिला आहे.’
संतोष सणगर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अभिजित गायकवाड यांनी आभार मानले. प्रशांत भोरे यांनी सुत्रसंचालन केले. माजी नगराध्यक्षा लता सुर्यवंशी, अभिजित पोळ, माजी उपनगराध्यक्ष सुनिल हुक्केरी, संदीप पाटील, गुरुप्रसाद यादव, अमोल हुक्केरी, सचिन चव्हाण, राजेंद्र देवस्थळी, शिवाजी आवळे, मिलिंद सनदी आदी उपस्थित होते.
----------
मोबाईल व टी.व्ही.च्या आतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केलेला हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
-एकनाथ आंबोकर,
-शिक्षणाधिकारी, कोल्हापूर