
कोतोलीच्या मैदानात माऊली कोकाटे विजयी.
02905
कोतोली ः अंतिम लढतीतील विजेता माऊली कोकाटे व उपविजेता हबीर जाफर यांना गौरविताना सरपंच प्रकाश पाटील, डी. जी. पाटील, सोपान पाटील आदी.
कोतोलीत माऊली कोकाटे विजयी
हनुमान यात्रेनिमित्त मैदान; मुलींच्या तीसहून अधिक कुस्त्या लक्षवेधी
पुनाळ, ता. ११ : कोतोली (ता. पन्हाळा) येथील हनुमान यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात पुण्याचा माऊली कोकाटे (पुणे) विजयी झाला. दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ एक नंबरची कुस्ती झाली. यामध्ये माऊलीने लपेट डावावर हबीर जाफर (इराण) याला चितपट केले. दहा मिनिटे चाललेल्या कुस्तीने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. द्वितीय क्रमांकाची लढत भगत खोतने रामा माने याला घुटना डावावर चितपट करून जिंकली. तिसऱ्या क्रमांकासाठी उदयराज पाल विरुद्ध सुदेश ठाकूर यांच्यामध्ये झालेली लढत बरोबरीत सुटली, तर चौथ्या क्रमांकाची लढत भोला पंजाबी विरुद्ध राघू ठोंबरे यांच्यात झाली. यामध्ये ठोंबरे विजयी झाला. तसेच कुमार शेलार, अमृत रेडेकर, तुकाराम सातपुते, श्रावणी लव्हटे, वीना गंधवाले, अक्षरा घुगरे यांनी रोमहर्षक कुस्त्या करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी दीडशेहून अधिक कुस्त्या झाल्या. मुलींच्या तीसहून अधिक कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. कुस्त्या पाहण्यासाठी आबालवृद्धांसह महिलांचीही उपस्थिती होती. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने मैदानात उपस्थिती लावली. यात्रा कमिटी व ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार झाला. कोरोना निर्बंधामुळे तीन वर्षे कुस्ती मैदान भरविले गेले नसल्यामुळे कुस्ती शौकीनांनी कुस्त्या पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. क्रीडाधिकारी अरुण पाटील यांनी नियोजन केले होते. पंच म्हणून नामदेव सातपुते, तानाजी ढवळे, सुरेश चौगुले, श्रीकांत पाटील, श्रीकांत सागावकर यांनी काम पाहिले. यावेळी सरपंच पी. एम. पाटील, डी. जी. पाटील, आर. एस. पाटील, संजय सबनीस, संकेत पाटील, विश्वास पाटील, बाबासो साळोखे, दत्तात्रय चेचरे, अविनाश कोतोलीकर, संदीप चौगुले, नामदेव पाटील उपस्थित होते. निवेदक दीपक वरपे यांनी समालोचन केले.
सोपान पाटील यांचा सत्कार
उद्योगपती सोपान पाटील यांची कोतोली यात्रेतील कुस्ती मैदानासाठी लाखाच्या पटीत बक्षीस देण्याची परंपरा आहे. पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी ते मदत करतात. यावर्षी देखील दीड लाखाची कुस्ती आयोजित करून त्यांनी ही परंपरा कायम ठेवली. त्यांच्या दातृत्वाचा गौरव म्हणून आनंदी फाउंडेशच्या वतीने मानाची गदा व प्रशस्तिपत्र देऊन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
Web Title: Todays Latest Marathi News Pul22b02784 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..