ऐतिहासिक माणगाव परिषद डॉ.बाबासाहेब यांना ऊर्जा देणारी घटना : डॉ. भिमराव आंबेडकर

ऐतिहासिक माणगाव परिषद डॉ.बाबासाहेब यांना ऊर्जा देणारी घटना : डॉ. भिमराव आंबेडकर

1766
माणगावः येथे परिषदेत बोलताना डॉ. भीमराव आंबेडकर. व्यासपीठावर अन्य मान्यवर. (फोटो:बुद्धम गवळी)
....


माणगाव परिषदेतून जगाला समतेचा संदेश

डॉ. भीमराव आंबेडकरः बौद्ध महासभेच्या वतीने परिषदेचे आयोजन


रुकडी ता.२२ : ‘शंभर वर्षांपूर्वी ऐतिहासिक माणगाव परिषदेतूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ऊर्जा मिळाली. यानंतरच खऱ्या अर्थाने बहुजनांचा उद्धार करणारा नेता म्हणून ते समाजाच्या पुढे आले, ’असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव आंबेडकर यांनी केले. ते माणगाव (ता. हातकणंगले) येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित शतक महोत्सवी समारंभप्रसंगी बोलत होते.

डॉ. भीमराव आंबेडकर म्हणाले की,‘ ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या शताब्दीतही त्या महापुरुषांनी दिलेल्या विचारांचा वारसा जोपासण्याची ग्वाही देण्यासाठी पुन्हा एकदा ही माणगाव परिषद होत आहे. ज्या महापुरुषांनी शंभर वर्षांपूर्वी बहिष्कृत व अस्पृश्य समाजासाठी न्याय देण्यासाठी या ऐतिहासिक भूमीमध्ये परिषद आयोजित करून जगाला समतेचा संदेश दिला, त्यांची तिसरी पिढी देखील त्यांचे विचार आजही जोपासण्यासाठी तत्पर आहे. समतेचे विचार, माणुसकीचा धर्म आणि करुणा लोकांमध्ये जागृत होऊन विषमता नष्ट होईल. त्यावेळी खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी दिलेल्या विचारांचा वारसा प्रत्येकाने जोपासला आहे, हे सिद्ध होईल. महापुरुष हे विशिष्ट जाती- धर्माचे किंवा संकुचित समाजाचे नसून हे संपूर्ण मानव जातीचे आहेत. जैन समाजाचे क्रांतिकारक नेते आप्पासाहेब पाटील यांनी माणगाव परिषदेस स्वतःची जागा देवून खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तनास सुरूवात केली. समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.’
भारतीय बौद्ध समाजाचे जिल्हाध्यक्ष एस.पी.दिक्षित म्हणाले, ‘भारतीय बौध्द समिती ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांवर कार्य करत असून त्यांच्या विचारांची वाहक आहे.’

याप्रसंगी आप्पासाहेब पाटील यांचे वंशज विक्रमसिंह पाटील यांना भारतीय बौध्द समितीच्यावतीने मानपत्र प्रदान करण्यात आले. दरम्यान, बिंदू चौक ते माणगाव दुचाकी रॅलीचे स्वागत भारतीय बौध्द समितीच्या वतीने करण्यात आले. रॅलीत हजारोंच्या संख्येने उपासक, उपासिका सहभागी झाले होते. ''ऐतिहासिक माणगाव परिषद गौरव ग्रंथ'' चे प्रकाशन यावेळी करण्यात आले. माणगावचे सरपंच राजू मगदूम यांच्या हस्ते डॉ.भीमराव आंबेडकर, विक्रमसिंह पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी केंद्रीय महिला विभाग प्रमुख सुषमा पवार, निवृत्त न्यायाधिश गुलाबराव औसरमल, राष्ट्रीय उपाध्यक्ष भडगावे,सत्यजित चव्हाण यांनी विचार व्यक्त केले. परिषदेस अंजलीताई आंबेडकर, भदंत संघपाल, भदंत धम्मप्रियाजी, एम. के.भंडारे, जगदीश गवई, सुशिलकुमार वाघमारे आदी उपस्थित होते.आभार रेखाताई बनगे यांना मानले.
...

शाळेचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करावे

परिषदेत विविध ठराव करण्यात आले. यामध्ये माणगाव येथील ज्या प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य होते, त्या शाळेचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करावे. तसेच माणगाव येथील गावतलाव सुशोभीकरणामध्ये राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा, आदी ठरावांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com