
कुंभार समाजातील गरीब कुटुंबातील युवकास उमेदवारीसहवोटनोट मदत बातमी
B02491
बामणी : येथे कुंभार यांना मदत देताना पांडुरंग पोतदार, शेजारी राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील अनुराधा पाटील व इतर.
बामणीत ‘वोट अन् नोटही’
सिद्धनेर्ली, ता. ७ ः बामणीत ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारीसाठी रस्सीखेच असतानाही पांडुरंग पोतदार यांनी अर्ज माघारी घेतलाच. शिवाय परिस्थितीने गरीब असलेल्या संतोष कुंभार यांना संधी देत खर्चासाठी निधीही दिला. त्यांनाच माजी सरपंच संध्या कोईगडे यांनीही मदत केली. उमेदवारी डावलल्यानंतर बंडखोरीसह इच्छुक नाराज दिसत होते. बंडखोर, नाराजांची समजूत काढण्यासाठी गटनेत्यांची दमछाक झाल्याचे चित्र एका बाजूला तर दुसरीकडे संतोष कुंभार यांना वोट आणि नोट असे प्रोत्साहन देण्याच्या प्रकाराची तालुक्यात चर्चा आहे.
याबाबत माहिती अशी की, बामणीत प्रभाग क्रमांक दोनमधून भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे समर्थक पोतदार व कुंभार यांनी इतर मागास प्रवर्गातून अर्ज दाखल केले होते. आज माघारीदिवशी पोतदार यांनी अर्ज मागे घेऊन कुंभार यांना संधी दिली. तसेच कुंभारांना निवडणूक खर्चासाठी मदतही केली. वोट व नोट मिळाल्यामुळे वेल्डिंग व्यावसायिक असलेल्या कुंभार यांनी दोघांचेही आभार मानले. यावेळी राजे बँकेचे अध्यक्ष एम.पी. पाटील, शिव-शाहू समविचारी ग्रामविकास आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवार सौ. अनुराधा पाटील, संदीप पाटील, रामचंद्र चौगुले, अशोक पाटील, शिवाजी मगदूम, महादेव कोईगडे, आनंदा पाटील उपस्थित होते.