
सिद्धनेर्ली आरोग्य शिबीर बातमी
02687
कागलच्या आरोग्य सेवेसाठी
विक्रमसिंह फौंडेशन कटिबद्ध
नवोदिता घाटगे; ६५५ रुग्णांची तपासणी
सिद्धनेर्ली, ता. १८ ः कॅन्सरमुक्त व निरोगी समाजासाठी राजे विक्रमसिंह फौंडेशन, राजमाता जिजाऊ महिला समिती व आरोग्य विभाग २४ तास उपलब्ध आहे. या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी केले.
येथे राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन संचालित सिद्धिविनायक नर्सिंग होमतर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर उद्घाटनवेळी त्या बोलत होत्या.
सिद्धनेर्ली विद्यालयात झालेल्या शिबिरात हृदयरोग ८६, मूत्रविकार १९, अस्थिविकार १०९, डोळेविकार २५६, हिमोग्लोबीन ६८ व जनरल तपासणी ११८ अशा ६५५ रुग्णांची तपासणी झाली. आवश्यकतेनुसार औषधोपचार झाले. निदान झालेल्या रुग्णांवर पुढील उपचार करण्यात येतील. सौ. घाटगे म्हणाल्या, कागलला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नसल्यामुळे आरोग्य तपासणीसाठी कोल्हापूर, पुणे, मुंबईला जावे लागते. समरजितसिंह घाटगेंच्या प्रयत्नांतून मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून देऊ.’ यावेळी तपासणीस आलेल्या ज्येष्ठ नागरिक व महिलांची घाटगेंनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तपासणी करुन घ्या. चांगले उपचार करू, असा आधार दिला.
डॉ. संजय शिरगावकर, डॉ. क्षितिज कुलकर्णी, डॉ. सुरेश पाटील, डॉ. रश्मी पाटील, डॉ. ज्योत्सना शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी झाली. यावेळी राजे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील, एन. के. मगदूम, नामदेव बल्लाळ, प्रताप पाटील, रामचंद्र वैराट, प्रकाश सुळगावे, चंदर पाटील, सुभाष शेंडे, मच्छिंद्र पाटील उपस्थित होते. ‘शाहू’चे संचालक प्रा. सुनील मगदूम यांनी स्वागत, राघू हजारे यांनी आभार मानले.