सिद्धनेर्ली कुस्ती मैदान बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धनेर्ली कुस्ती मैदान बातमी
सिद्धनेर्ली कुस्ती मैदान बातमी

सिद्धनेर्ली कुस्ती मैदान बातमी

sakal_logo
By

02754

सिद्धनेर्लीतील मैदानात जमदाडे विजयी घोषित
सिद्धनेर्ली, ता. २३ : येथील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत माऊली जमदाडे याला प्रतिस्पर्धी योगेश पवार याने दुखापतीमुळे माघार घेतल्याने विजयी घोषित केले. मैदानात सव्वाशेहून अधिक कुस्त्या झाल्या.
उरुसानिमित्त सिद्धेश्वर कुस्ती संकुल व ग्रामस्थांनी जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने कुस्ती मैदान घेतले. आखाडापूजन सरपंच दत्तात्रय पाटील यांनी केले. माजी आमदार संजय घाटगे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला.
माऊली जमदाडे व योगेश पवार यांची कुस्ती रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी सुरू झाली. सुरुवातीला दोघांनीही ताकदीचा अंदाज घेतला. माऊलीने टांग मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर योगेशने कब्जा घेतला. योगेशचा एकेरी पट काढण्याचा प्रयत्न, माऊलीचा आकडी लावण्याचा प्रयत्न पुन्हा ढाक लावण्याचा माऊलीचा प्रयत्न अशी डाव-प्रतिडावांची मेजवानी पहावयास मिळाली. तिसाव्या मिनिटाला योगेशच्या हाताला दुखापत झाल्यामुळे माघार घेतल्याने माऊलीला विजयी घोषित केले.
दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत व्यंकोबा तालमीच्या विक्रम शेटे याने गंगावेश तालमीच्या दत्ता नरळे याला लपेट डावावर आसमान दाखविले. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या कुस्तीत बानगेच्या शशिकांत बोंगार्डेने पुण्याच्या केवल भिंगारेवर घिस्सा डावावर विजय मिळविला. व्यंकोबा तालमीच्या श्रीमंत भोसलेने मंडलिक आखाड्याच्या रोहन रंडेवर घिस्सा डावावर विजय मिळविला. द-याचे वडगावच्या कृष्णा कांबळेने शाहू आखाडाच्या नीलेश पवारला छडी टांग लावून आसमान दाखविले. किरण पाटीलने गणेश जाधववर घिस्सा डावावर विजय मिळवला. सिद्धनेर्लीच्या सुरज पालकरने कलाजंग डंकी डावावर शुभम खाडेवर रोमहर्षक विजय मिळविला. इतर कुस्त्यांतील विजयी मल्ल : सचिन पाटील, शुभम कोळेकर, ओंकार लंबे, विवेक चौगुले, अनिल पाटील, हर्षवर्धन वाडकर, किरण पाटील बेलवळे, रणजीत देसाई, कुमार बनकर, हरीश पाटील, ओंकार लाड, राशिवडे, मयूर चौगुले, सुदर्शन पाटील, हर्षवर्धन एकशिंगे.
----------------
महिलांच्याही कुस्त्या...
येथे प्रथमच महिलांच्या कुस्त्या झाल्या. ईश्‍वरी हजारे व अनुराधा गांजवे, सोनल खोत व श्रुतिका पाटील यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविली. पूजा सासणेने प्रणाली पवारवर, तृप्ती गुरवने आर्या पाटीलवर मात केली. आरोही मोरे, मधुरा यादव, अलिषा कुऱ्हाडे, स्वरा बोडके यांनीही चटकदार कुस्त्या केल्या.