
उदं गं आई उदंच्या गजरात कौलवला रेणुका देवीची यात्रा
02214
कौलव : उदं गं आई उदं... च्या गजरात येथील रेणुका देवीची आंबील यात्रा मंगळवारी झाली. दुपारी भाविकांनी कोतवालासह आंबील नैवेद्याची मिरवणूक काढून मंदिरासमोर महाआरती केली. (राजू कुलकर्णी : सकाळ छायाचित्रसेवा)
उदं गं आई उदंच्या गजरात
कौलवला रेणुका देवीची यात्रा
भंडाऱ्याची मुक्त उधळण; आंबील नैवेद्याची मिरणूक
शाहूनगर, ता. १४ : उदं गं आई उदंचा अखंड गजर आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण अशा भक्तिमय वातावरणात कौलव (ता. राधानगरी) येथील श्री. रेणुका देवीची आंबील यात्रा झाली. रंगपंचमीदिवशी सौंदलगा येथील रेणुका देवीची यात्रा असते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी येथील रेणुका देवीची आंबील यात्रा भरते. यात्रेनिमित्त मंगळवारी सकाळी देवीची अलंकारिक पूजा बांधण्यात आली. अभिषेक व आरती झाली. दुपारी येथील बळवंत केरबा पाटील यांच्या घरातील गादीच्या ठिकाणाहून देवीच्या कोतवालाची (घोड्याची) गावातून सवाद्य मिरवणूक निघाली. मिरवणुकीत महिला व माहेरवाशीणी आंबील घुगऱ्याचा नैवेद्य घेऊन सहभागी झाल्या होत्या. मिरवणूक रेणुका मंदिरात आल्यानंतर मंदिराभोवती कोतवालाची प्रदक्षिणा (सबिना) झाली. आरती झाल्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिर परिसरात खेळण्यांचे व खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. संध्याकाळी वाद्यांच्या गजरात देवीच्या कोतवालाची बळवंत पाटील यांच्या घरी पाठवणे करण्यात आली. मंदिर समितीने यात्रेचे नेटके संयोजन केले.