शिराळा:राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचा अजामीनपात्र वारंटचा आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिराळा:राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचा अजामीनपात्र वारंटचा आदेश
शिराळा:राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचा अजामीनपात्र वारंटचा आदेश

शिराळा:राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचा अजामीनपात्र वारंटचा आदेश

sakal_logo
By

राज ठाकरे यांना अजामीनपात्र वॉरंट

तारखांना गैरहजर : शिराळा न्यायालयाकडून मुंबई आयुक्तांना विचारणा

शिराळा, ता. ३ : शिराळा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यास वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. सातपुते यांनी १८ जानेवारी २०२२ रोजी अजामीनपात्र वॉरंटचा आदेश केला आहे. तो पोलिसांकडून बजावण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे ठाकरे यांनी स्वतः न्यायालयात हजर राहून वॉरंट आदेश रद्द न केल्यास ८ जून २०२२ पर्यंत मुंबई पोलिस ठाकरे यांना अटक करून शिराळा न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.
ैअधिक माहिती अशी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत व शिरीष पारकर यांच्यासह दहा जणांवर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे, शांततेचा भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे, घोषणाबाजी करणे अशा विविध कलमांखाली शिराळा न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. २००८ मध्ये भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसेतर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले होते. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांना रत्नागिरी येथे अटक करून कल्याण न्यायालयात नेल्याने महाराष्ट्रभर मनसेने आंदोलन करून अनेक ठिकाणी बंद पुकारला होता.
शिराळा तालुका मनसेकडून जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून त्यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये ९ नंबरचे संशयित आरोपी म्हणून राज ठाकरे व तत्कालीन मनसेचे नेते शिरीष पारकर यांना दहा नंबरचे संशयित सहआरोपी करण्यात आले होते.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल राज ठाकरे व शिरीष पारकर यांच्याविरुद्ध यापूर्वी देखील वॉरंट काढले होते. तत्कालीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी किरण माने यांनी २०१४ मध्ये दोघांकडून जामीन स्वीकारून वॉरंट रद्द केले होते. त्यानंतर राज्य शासनाकडून राजकीय आंदोलनातील अनेक गुन्हे मागे घेतले गेले. परंतु अद्यापही हा गुन्हा कायम आहे. काही वर्षांपासून संशयित आरोपी न्यायालयात फिरकले नसल्यामुळे डिसेंबर २०२१ मध्ये दहा जणांना वारंटचा हुकूम काढला होता. आठ जणांनी जानेवारी २०२२ वारंट हुकूम रद्द करून घेतला. परंतु राज ठाकरे व शिरीष पारकर हे न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यामुळे १८ जानेवारी २०२२ रोजी न्यायालयाने मुंबई पोलिस आयुक्तांनाच या दोघांना का अटक केली नाही अशी कारणे दाखवा नोटीस बजावली.
..............
चौकट
सहा तारखांना गैरहजर-
१८ व २५ जानेवारी, ११ फेब्रुवारी, १४ व २८ मार्च, २८ एप्रिल २०२२ या तारखांना श्री. ठाकरे व श्री. पारकर गैरहजर होते. पुढील तारीख ८ जून २०२२ आहे. अजामीनपात्र वारंट असताना चार महिन्यांतील सहा तारखांना ते गैरहजर राहिले आहेत.
............
कोट-

‘‘राज ठाकरे यांना नजीकच्या काळात शिराळा न्यायालयात हजर राहून अजामीनपात्र वॉरंट रद्द करून घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. लवकरच ते शिराळा न्यायालयात हजर राहतील.’’
ॲड. रवी पाटील (राज ठाकरे यांचे वकील)

Web Title: Todays Latest Marathi News Sla22b04499 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top