
भोगावती साखर कारखांना बिनविरोध निवडणूकीसाठी अग्रेसर राहू. माजी आमदार संपतराव पवार पाटील.
01470
भोगावती बिनविरोधसाठी शेकापची तयारी
संपतराव पवार-पाटील; कोथळीत कार्यकर्त्यांचा मेळावा
सोनाळी, ता. ११ : भोगावती सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात सापडला असून कारखाना ५२ गावांच्या ऊस उत्पादकांची जीवनदायिनी आहे. कारखाना वाचला तरच ऊस उत्पादक शेतकरी टिकतील. यासाठी शेतकरी कामगार पक्षाची भूमिका सभासद हिताच्या दृष्टीने निर्णायक आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध होत असेल तर शेकापची तयारी आहे. अन्यथा सत्ताधाऱ्यांविरोधात समविचारी पक्षांना एकत्र करून निवडणूक लढवू, असे प्रतिपादन माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केले.
कोथळी (ता. करवीर) येथे भोगावती कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजीत करवीर व राधानगरी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. अध्यक्षस्थानी भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक आण्णासो पाटील होते.
माजी उपाध्यक्ष केरबा पाटील म्हणाले, ‘भोगावतीने शेकापच्या सत्ताकाळात सुवर्णकाळ अनुभवला. त्या काळात आम्ही ९ कोटींच्या ठेवी शिल्लक ठेवल्या होत्या. आता निवडणूक बिनविरोध होत असेल तर प्रयत्न करु अन्यथा सक्षम आघाडी करुन परिवर्तन करू.’
एम. डी. निचिते, बाळासाहेब पाटील, दौलत कांबळे, नंदकुमार पाटील, रंगराव पाटील, तुकाराम खराडे, श्रीपती धोंडी पाटील, पांडुरंग पाटील, शिवाजी सावंत यांची भाषणे झाली. यावेळी माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार-पाटील, बाबासाहेब देवकर, एकनाथ पाटील, अंबाजी पाटील, संभाजी पाटील, दत्तात्रय हणमा पाटील, मोहन पाटील, शरद पाटील, संग्राम पाटील, शामराव मुळीक उपस्थित होते.