
सरसेनापती संताजी घोरपडे स्मारकाचे आज भूमिपूजन सेनापती कापशीः नऊ कोटी खर्चाचे स्मारक, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते भूमिपूजन
सरसेनापती संताजी घोरपडे
स्मारकाचे आज भूमिपूजन
सेनापती कापशी, ता. १२ : महान पराक्रमी मराठा योद्धा सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या येथील स्मारकाच्या उभारणीला निधी मिळाल्याने बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. नऊ कोटी रुपये खर्चाच्या या स्मारकाचे भूमिपूजन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व सरसेनापतींचे बारावे वंशज श्रीमंत उदयबाबा घोरपडे, जिल्हा परिषद सदस्या शिल्पा शशिकांत खोत यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (ता. १३) सायंकाळी होणार आहे, अशी माहिती स्मारक समितीचे सदस्य शशिकांत खोत यांनी दिली.
खोत म्हणाले की, सन २०१३ मध्ये या स्मारक उभारणीसाठी मंत्री मुश्रीफ यांनी पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपये मंजूर केले होते. त्यातून प्रस्तावित स्मारक कंपाउंड भिंत, बहुउद्देशीय हॉल, संग्रहालय, अतिरिक्त विद्युतीकरण ही कामे होती. त्यापैकी कंपाउंड भिंतीचे काम झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात बहुउद्देशीय हॉल व संग्रहालय, उर्वरित कंपाउंड भिंत, पाणीपुरवठा व मलनिस्सारण, सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, संग्रहालय इमारतीचे फर्निचर, हरित इमारत, पेव्हिंग ब्लॉक अशी कामे होणार आहेत. त्यासाठी नऊ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
यावेळी युवराज पाटील, प्रताप माने, सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, कार्यकारी अभियंता संजय पाटील, वास्तू विशारद अमरजा निंबाळकर, डी. व्ही. शिंदे, एस. एल. पवार, टेक्नोबिल्ट कन्स्ट्रक्शन अँड सप्लायर्सचे जी. एच. मुलाणी आदी उपस्थित राहणार आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Snk22b01310 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..