पारावरची चर्चा...सेनापती कापशी.. उमेदवार मी पाहीजे...नाहीतर माझ्या घरातला पाहीजे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारावरची चर्चा...सेनापती कापशी..
उमेदवार मी पाहीजे...नाहीतर माझ्या घरातला पाहीजे...
पारावरची चर्चा...सेनापती कापशी.. उमेदवार मी पाहीजे...नाहीतर माझ्या घरातला पाहीजे...

पारावरची चर्चा...सेनापती कापशी.. उमेदवार मी पाहीजे...नाहीतर माझ्या घरातला पाहीजे...

sakal_logo
By

पारावरची चर्चा…..


वरचे अन खालचेबी नेते तसेच...
हल्ली गावातील चौकात डिजिटल लावण्यासाठी काहीही निमित्त पुरेसे असते. त्यात निवडणूक म्हंटले, की कायदशीर बाबी तपासत सारेच चौका- चौकात प्रचाराचे फलक उभारतात, नव्हे चौकच डिजिटल फलकानी भरून जातो. सेनापती कापशीतील फोटोग्राफरजवळ असेच एक साठीकडे झुकलेले शेतकरी जोडपे आले, अपक्ष उमेदवारी असलेल्या पत्नीचा डिजिटल करण्यासाठी ते आले होते. वयाचा विचार करता निवडणुकित ते प्रचंड उत्साही, आक्रमक होते. सेनापती कापशीच्या पश्चिमेकडील चिकोत्रा काठावरच्या गावात ग्रामपंचायतीला एका गटाने उमेदवारी नाकारल्याने ते दुखावलेल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. ते त्वेषाने सांगत होते, की ''वरचे नेतेबी तसेच आणि खालचे नेतेबी तसेच'' प्रत्येक निवडणूकीत ''मी पाहीजे... नाहीतर माझ्या घरातलातरी उमेदवार पाहीजे.'' सगळीकडे हेच कशाला? मग आम्ही काय करायचं? १९७२ पासून लग्न, बारशे, वास्तुशांतीसाठी स्पिकरचा व्यवसाय करतोय. गावात माझं दीडशे मतदान आहे, बघतोच आता, ‘निवडून येऊन दावतो, त्या नेत्याला‘. -- प्रकाश कोकितकर, सेनापती कापशी.

---------
‘गाव तसं चांगलं, पण नेत्याच्या दावणीला बांधलं‘
गेली चार वर्ष गावामध्ये सगळं कसं छान चाललं होतं, ग्रामपंचायत निवडणुक लागली अन सारचं वातावरण बिघडलंय गा ? असं पांडू तात्या हे सदू तात्यांना सांगत होते. हे ऐकून सदू तात्याही म्हणाले होय गा! महिना झालं गावातली तरुण पोरं सगळी नेता व्हायला चालल्यात. मोठमोठे नेते गावातल्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरात येऊन तूच आमचा युवा नेता म्हणून अर्ज भरायला लावल्यात अन आता माघारीवरून हमरी तुमरी उडाल्या? मतदार संख्या जास्त असणाऱ्या घराण्यात भावकी भावकीतच उमेदवारी दिल्यानं सगळ्या भाऊबंदकीत वांदे झाले बघा? अशी चर्चा गावातल्या पारावर ज्येष्ठात सुरू आहे.
प्रत्येक उमेदवार ते आमचं जुनं पाहुणं, तो आमचाच मतदार. या भ्रमात उमेदवार आहेत, तर गावातले नेते, आम्ही गावचा हा विकास करतो- तो विकास करतो असं बडबडत सुटलेत. नेमकं गावचा विकास कोण करणार? असा प्रश्न पडलाय. उमेदवार वार्डा-वार्डात आपली प्रचारा यंत्रणा कशी राबवता येईल, त्याबाबत क्लुप्त्या लढवताना दिसतोय. काही उमेदवार मिळालेले चिन्ह घेऊनच कीर्तना दिसत आहेत. पण गावातली सगळी पोरं नेत्याच्या दावणीला बांधून पाठीमागं फिरताना दिसत आहेत. - गजानन खोत, तारदाळ
-------------------

खोबरं गावलं, तिकडं चांगभल..

पश्चिमेकडील भुदरगड तालुक्यातील एका गावात निवडणूक प्रचाराचा प्रारंभ झाला. प्रमुख कार्यकर्त्यांना श्रीफळ वाढविण्यासाठी बोलवले जात होते. युवा कार्यकर्ते , जेष्ठ नागरीक, आण्णा, बापू, तात्या सगळेच पुढे येऊन श्रीफळ वाढवीत होते. प्रचार प्रारंभ स्थळी खोबऱ्याच्या भकलांचा अक्षरशः ढीग लागला होता. सगळेजण प्रचाराच्या प्रारंभ आनंदात मग्न होते. एवढ्यात एक सामान्य कार्यकर्ता पुढे येऊन भकलं प्लास्टिक टपात भरुन घेऊ लागला. त्याची ही कृती पाहून एक कळकोटा मतदार म्हणाला, ‘आगा ये... तू आमच्या गटाचा हाईस काय तेंच्या?‘ हा प्रश्न ऐकून सामान्य माणूस म्हणाला, ‘आमचं कसं हाय.... खोबरं गावल तिकडं चांगभलं‘. हे ऐकून उपस्थित लोकात एकच हाशा पिकला. ‘तुमचीच काय? अनेकांची हिच स्थिती हाय'' असा गर्दीतून एकानं आवाज काढला अन सारेच बावरले. सामान्य कार्यकर्ता मात्र टप भरुन खोबरी भरुन घेऊन अंधारात गूल झाला.- संजय खोचारे, पिंपळगाव.