
कागल मधील राजकीय परिवर्तनाची नांदी -समरजितसिंह घाटगे
02076
राजकीय परिवर्तनाची
कागलला नांदी ः घाटगे
बांधकाम कामगारांना साहित्य वाटप
सेनापती कापशी, ता. १५ : भाजपाला कागल विधानसभा मतदारसंघात वाढता प्रतिसाद म्हणजे राजकीय परिवर्तनाची नांदी आहे, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. माद्याळ (ता. कागल) येथे बांधकाम कामगारांना साहित्य वाटप व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
निराधारांची पेन्शन वाढवून दीड हजार करण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल श्री. घाटगे यांचा आणि सुनील घाटगे यांचा उत्कृष्ट कोतवाल पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार झाला. श्री. घाटगे म्हणाले, ‘माद्याळ व मासा बेलेवाडी साठवण तलावासाठी तत्कालीन भाजप सरकारच्या काळात ३० कोटी निधी मंजूर होता. विकासकामांचा डांगोरा पिटणाऱ्या आमदार मुश्रीफ यांनी काम झाल्यावर शेतकरी आपल्याकडे येणार नाहीत. त्यांनी वारंवार आपल्याकडे खेटे मारावेत म्हणून कामाकडे दुर्लक्ष केले. आम्ही तलावाचे काम सुरू केले, तर माद्याळचे काम लवकरच सुरू करू. निराधारांची पेन्शन एक हजारवरुन दीड हजार रुपये अशी वाढ शिंदे-फडणवीस सरकारनेच केली.’ यावेळी संजय बरकाळे, सागर मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले. अनुप पाटील, संजय पाटील, प्रा. सुनील मगदूम, विठ्ठल उत्तूरकर, सोनूसिंह घाटगे, दत्तात्रय चव्हाण, राजाभाऊ माळी, दिलीप तिप्पे उपस्थित होते. ‘शाहू’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी स्वागत, संभाजी चौगले यांनी आभार मानले.