
बेनिक्रेत सरपंच विरोधात अविश्वास ठराव दाखल
बेनिक्रेत सरपंचांविरोधात
अविश्वास ठराव दाखल
सेनापती कापशी: बेनिक्रे (ता. कागल) येथील सरपंच अश्विनी पांडूरंग गुरव यांच्या विरोधात सात सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. सदस्यांना विश्वासात घेतले नाही, दोन वर्षे पंधराव्या वित्त आयोगातील ३० लाख रक्कम शिल्लक ठेवली, धनादेशावर स्वाक्षरी न करणे, विकासकामांना ठराव न देणे अशा अनेक कारणांसाठी त्यांच्याविरोधात नऊ पैकी सात सदस्यांनी ठराव करुन तहसिलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे सादर केला आहे. त्यावर उपसरपंच सूर्याजी जाधव, सचिन वाडकर, बाजीराव कांबळे, कृष्णा जाधव, छाया कळके, अमिता पालकर, मनीषा पाटील यांच्या सह्या आहेत. अडीच वर्षापूर्वी समविचारी आघाडी होऊन येथील निवडणूक झाली होती. ओबीसी महिला सरपंच आरक्षण झालेल्या ठिकाणी राजे गटाच्या अश्विनी गुरव या एकमेव ओबीसी सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे अविश्वासानंतरही नव्या सरपंच कशा होणार, याचा तिढा कसा सुटणार हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्या या आरक्षणाच्या त्या एकमेव सदस्य आहेत. त्यामुळे अविश्वास ठराव मंजूर झाल्यावरही पेच निर्माण होणार आहे.