
सरवडे
बेदरकार अवजड वाहतुकीच्या
रहदारीने ग्रामस्थ भीतीच्या छायेत
सरवडे, ता.११: रेंगाळलेली थेट पाईपलाईन आणि संथ गतीने चालले रस्त्याचे काम याचा धोका आकनूर (ता. राधानगरी) येथील नागरिकांना होत आहे. मांगेवाडी-आकनूर -खिंडी व्हरवडे या मार्गे अवजड वाहतुकीच्या बेदरकारी रहदारीमुळे आकनूरवासीय भयभीत होऊन जगत आहेत. मुधाळतिठ्ठा व मांगेवाडी येथे अवजड वाहतूक केली जाऊ नये यासाठी सुरक्षारक्षक नेमले आहेत. परंतु, हीच यंत्रणा कुचकामी ठरली आहे.
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम गेले काही वर्षे रेंगाळल्याने परिसरातील नागरिकांना फटका बसला. निपाणी-देवगड या राज्य मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम संथगतीने सुरु आहे. याच मार्गावर मांगेवाडी ते सोळांकूर पाईपलाईन व रस्त्याचे काम सुरू केले. परिणामी अवजड वाहतुकीची रहदारीचा पर्यायी मार्ग मुधाळ तिठ्ठ्यावरुन शेळेवाडी व भोगावती असा केला. परंतु त्यालाच वाहनधारकांनी वेळ, इंधन व पैसा वाचवण्यासाठी मुधाळतिठ्ठा- मांगेवाडी -आकनूर -खिंडी व्हरवडे असा केला. परंतु पर्यायी मार्गाने अवजड वाहतूक होण्यासाठी मु.तिठ्ठा व मांगेवाडी येथे बँरिकेटस बसवून सुरक्षा रक्षकांची व्यवस्था केली. अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी येथील सुरक्षा रक्षकांना भीती व दमदाटी करून वाहने सुसाट वेगाने नेण्याचे काम सुरूच ठेवले. काही दिवसापूर्वी बोरवडे फाट्यावर भरधाव कंटेनरने देवदर्शन करुन परतणाऱ्या कोडणी निपाणी येथील पती पत्नी यांचा अक्षरशः चेंदामेंदा केला होता. याचा मोठा फटका आकनूर येथील नागरिकांना बसत आहे. येथील मध्यवस्तीतून मुख्य अरुंद रस्ता व दाट लोकवस्ती,रस्त्याची झालेली दयनीय अवस्था यामुळे अपघाताची टांगती तलवार घेऊनच वावरावे लागत आहे. या मार्गावर प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत ,तलाठी, दूधसंस्था, सेवासंस्था यांची कार्यालये, मंदिरे व छोटीमोठी दुकाने असल्याने नेहमीच वर्दळ असते. मोठमोठी अवजड वाहनांच्या रहदारीमुळे सर्वच नागरिकांना कधी एखादी आपत्ती येईल अशी नेहमीच भीती वाटते.
Web Title: Todays Latest Marathi News Sol22b02248 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..