
सरवडे
राधानगरी तालुक्यात पावसाच्या दडीने शेतकरी चिंतातुर
काळम्मावाडी कालव्यातून पाणी सोडण्याची नंदकिशोर सूर्यवंशी यांची मागणी
सरवडे,ता.२६:
राधानगरी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकर्यांनी बहुतांशी भात रोप लागणीची कामे आटोपून घेतली. मात्र गेली चार दिवस पावसाने दडी मारल्याने माळ रानातील पिकांना व राहिलेल्या भात रोप लागणीला पाण्याची नितांत गरज आहे. यासाठी काळम्मावाडीच्या दोन्ही कालव्यातून पाणी सोडावे अशी मागणी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक नंदकिशोर सूर्यवंशी यांनी केली.
राधानगरी तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात पावसाने मुसळधार पाऊस झाल्याने भात रोप लागण कामाला गती आली. जोरदार पावसामुळे तालुक्यातील राधानगरी,काळम्मावाडी,तुळशी धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. संततधार पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना व भात रोप लागणीला हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरला. त्यामुळे बळीराजा सुखावून गेला. मात्र पावसाचे अंदाज वर्तवले जात असताना देखील गेली चार दिवस संततधार पाऊस थांबला असून गरजेच्या काळात पाऊस थांबल्याने शेतकर्यांच्या डोळे आकाशाकडे लागले आहेत.
राधानगरी तालुक्यात ऊसाबरोबर भात पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी पावसाची हजेरी लांबणीवर पडल्याने भाताची रोप लागण खोळंबली होती. तसेच भाताच्या तरव्यांची देखील पुर्ण क्षमतेने वाढ होऊ शकली नाही. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने संततधार सुरू केल्याने खोळंबलेल्या भात लागणींना वेग आला. तसेच पेरणी केलेली पिके व ऊसाला पाऊस लाभदायक ठरला. त्यामुळे शेतकरी समाधानी होता. मात्र चार दिवस झाले पावसाने पाठ फिरवली असून शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
सद्या पाऊस नसल्याने पिकांना विशेषतः रोप लागण केलेल्या भाताला पाण्याची गरज असून कांही शेतकर्यांच्या भात लागणी करावयाच्या आहेत. यासाठी पाण्याची गरज असून काळम्मावाडी प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून पाणी सोडून कालव्याकाठच्या शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सुर्यवंशी यांनी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Sol22b02288 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..