
सरवडे
03346
...
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकून
दुचाकीस्वार जागीच ठार
चंद्रे-तळाशीदरम्यान अपघात; मृत तळाशीचा
सरवडे, ता. १५ : कोल्हापूर-गारगोटी मार्गावर चंद्रे-तळाशी दरम्यान लाकडाने भरलेल्या ट्रॉलीला दुचाकीस्वाराने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार प्रकाश दादू सावरतकर (वय ५०, रा. तळाशी, ता. राधानगरी) जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. सावरतकर यांचे हॉटेल असून, ते हॉटेलमधील कचरा टाकण्यास गेले असता हा अपघात घडला. अपघाताची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे.
याबाबत माहिती अशी, प्रकाश सावरतकर तळाशी पाटी येथे हॉटेल आणि नाष्टा सेंटर चालवतात. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हॉटेलमधील काम आटोपल्यानंतर ते साचलेला कचरा टाकण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. कचरा टाकून परत येत असताना चंद्रे पाटी येथे लाकडाने भरलेला ट्रॅक्टर बंद पडल्याने ट्रॉलीसह रस्त्याच्या बाजूला लावला होता. अंधार असल्याने आणि ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने सावरतकर यांची दुचाकी ट्रॉलीला जोरदार धडकली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सावरतकर जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की, धडकेनंतर दुचाकी लाकडामध्ये अडकून राहिली होती. प्रकाश यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, सून असा परिवार आहे. कोल्हापुरात शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी पहाटे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
.......
रिफ्लेक्टर असता तर....
कोल्हापूर-गारगोटी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यातच रस्त्याचे काम सुरू आहे. ट्रॉलीच्या मागे रिप्लेक्टर असता तर कदाचित प्रकाश यांचा जीव वाचला असता, शिवाय त्यांनी हेल्मेटही घातलेले नव्हते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनचालकांनी हेल्मेट वापरण्याबरोबरच सर्वच वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याचे आवाहन राधानगरी पोलिसांनी केले आहे.