शिरोळमध्ये लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोळमध्ये लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे
शिरोळमध्ये लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे

शिरोळमध्ये लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे

sakal_logo
By

शिरोळमध्ये लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे
गुन्हेगारीला बसणार चाप; पत्रकार संघ, काही लोकप्रतिनिधींचा पुढाकार
शिरोळ, ता. १६ ः शहरामध्ये लोकसहभागातून सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.
शहरामध्ये आठ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असल्याने गुन्हेगारीला चाप बसवण्यास मदत होणार आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य निळकंठ ऊर्फ पिंटू फल्ले यांनी या कामासाठी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुमारे चाळीस हजार लोकसंख्या झाली आहे. रस्त्यावर वाहनांची संख्या वाढल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाढीव गावठाण हद्दीमध्ये लोकवस्ती वाढत असल्यामुळे गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी व अपघात झाल्यास संबंधित घटनेचा तपास करण्यास मदत होण्यासाठी शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
नगरपरिषदेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याबाबत नगरपरिषदेकडून हालचाली होत नाहीत. यामुळे लोकसहभागातून शहरांमधील आठ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी काही लोकप्रतिनिधी, तसेच शिरोळ शहर पत्रकार संघाने पुढाकार घेतला आहे. सुमारे तीन लाख रुपये यासाठी खर्च अपेक्षित आहे. मंगळवारी ग्रामपंचायत माजी सदस्य नीलकंठ फल्ले यांनी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे.
-------------
शिरोळमधील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पत्रकार संघ व सामाजिक कार्यकर्ते पुढे येत आहेत, ही बाब आनंदाची आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे पोलिस प्रशासनाला मदत होणार आहे.
-दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलिस निरीक्षक, शिरोळ पोलिस ठाणे