
शिरोळमध्ये मुख्याधिकाऱ्यांना घेराओ
66097
शिरोळ ः विकास आराखड्यातील संभाव्य आरक्षण रद्द करावे यासाठी अभिजित हराळे यांना निवेदन देण्यात आले.
----------
शिरोळमध्ये मुख्याधिकाऱ्यांना घेराओ
विकास आराखड्यातील संभाव्य आरक्षण रद्द करण्याची मागणी
शिरोळ, ता. २ ः शहराचा विकास आराखडा तयार करताना नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहमतीने आरक्षण टाकावे, या मागणीसाठी काही नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी मुख्याधिकारी अभिजित हराळे यांना घेराओ घालून जाब विचारला. खासगी जागेवर सध्या टाकलेले आरक्षण रद्द करावे व सुधारित आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींची बैठक घ्यावी, अशी त्यांनी मागणी केली.
शिरोळच्या संभाव्य विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर ३१ ठिकाणी आरक्षण टाकण्यात आले होते. जेथे आरक्षण टाकले आहे, त्या ठिकाणचे नाव व पत्ता या बाबी अधिकृतरित्या नगरपरिषदेमार्फत प्रसिद्ध केलेल्या नाहीत. तथापि दोन दिवस सोशल मीडियावर संभाव्य आरक्षण टाकल्याच्या ठिकाणाची यादी व्हायरल झाल्याने संबंधित मिळकतधारकांनी याबाबत शुक्रवारी नगरपरिषदेत धाव घेतली.
आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, भाजपचे जिल्हा युवा अध्यक्ष पृथ्वीराज यादव, सदाशिव महात्मे, सचिन जगदाळे, बाळासो पाटील आदींनी मुख्याधिकारी अभिजित हराळे यांना घेराओ घालून आरक्षण चुकीच्या पद्धतीने टाकले आहे ते तत्काळ रद्द करावे, अशी मागणी केली.
यावेळी या आरक्षणाशी नगरपरिषदेचा काही संबंध नाही, नगर विकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी ते निश्चित केले आहे, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील घटनास्थळी आले. या आरक्षणाशी नगरपरिषदेचा संबंध नाही. तथापि आरक्षण चुकीचे आहे, असे वाटत असल्यास नगरसेवकांची लवकरच बैठक बोलावली जाऊन यामध्ये संभाव्य आरक्षणावर चर्चा होईल. आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी संभाव्य आरक्षण कोठे टाकावे याच्यावर एकमत करावे, असे सांगितले. आठवडाभरात बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले.