शिरोळला ज्येष्ठांकडून वाचन संस्कृती जिवंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोळला ज्येष्ठांकडून वाचन संस्कृती जिवंत
शिरोळला ज्येष्ठांकडून वाचन संस्कृती जिवंत

शिरोळला ज्येष्ठांकडून वाचन संस्कृती जिवंत

sakal_logo
By

शिरोळला ज्येष्ठांकडून वाचन संस्कृती जिवंत
---
राजर्षी शाहू वाचन मंदिरात लहानांपासून वृद्धांपर्यंत उपयोगी साहित्य
डी. आर. पाटील ः सकाळ वृत्तसेवा
शिरोळ ता. २५ ः टीव्ही, मोबाईल, इंटरनेट यांसारख्या आधुनिक माध्यमांकडे युवा पिढी आकर्षित झाली असताना शिरोळ येथील राजर्षी शाहू वाचन मंदिरात सुमारे ३०० पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांनी वाचन संस्कृती जिवंत ठेवली आहे. वाचन संस्कृती टिकली पाहिजे, यासाठी येथील वाचन मंदिराच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बालकांना बालसाहित्य, तरुणांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके, वृद्धांना विविध प्रकारचे दुर्मिळ ग्रंथ यांचे भरगच्च भांडार या वाचन मंदिरात उपलब्ध करून ठेवले आहे. वाचन मंदिर १५० वर्षांच्या वाटचालीची झेप घेत असले, तरी युवा पिढीने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.
चौथे छत्रपती शिवाजी यांनी १४७ वर्षांपूर्वी दोन खोल्या व २५ रुपयांची देणगी देऊन तालुका वाचनालय सुरू केले. कालांतराने या वाचनालयास लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व प्रकारची मदत केली. रविवारी या वाचनालयात गर्दी व्हायची. काही दैनिकांमध्ये रविवारी होणाऱ्या मनोरंजनासह विविध प्रकारचे साहित्य वाचण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी असायची. तत्कालीन अध्यक्ष (कै.) एल. के. पाटील यांनी या वाचनालयाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी समाजातील थोर देणगीदारांबरोबरच सहकारी संस्थांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून वाचनालयाचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला. येथील बुद्धिजीवी तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शतकोत्तर समारंभ मोठ्या दिमाखात साजरा केला होता.
--------------
वाचनालयात किमान २०० पेक्षा अधिक नागरिक रोज दैनिक, साप्ताहिके, मासिके वाचण्यासाठी येतात. खऱ्या अर्थाने वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी ज्येष्ठांचे योगदान मोलाचे ठरत आहे. त्याची दखल युवा पिढीने घेऊन शिरोळमध्ये वाचन संस्कृती वाढण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.
- संभाजी चव्हाण, ग्रंथपाल
----------
पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षासाठी नाममात्र पाच रुपये शुल्क आकारून विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. तसेच, १८ वर्षांवरील युवक व नागरिकांसाठी वार्षिक वर्गणी १०० रुपये घेऊन विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. भविष्यात पुस्तकांना बारकोड करून संगणकाच्या माध्यमातून पुस्तके उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
- प्रा. अण्णासाहेब गावडे, अध्यक्ष
---------------
ग्रंथालयातील साहित्य
कथा- ४०२५०, कादंबऱ्या- १०८४०, ललित साहित्य- ८९०, धर्म- २६३०, निबंध- ३०२४०, स्पर्धा परीक्षा- ७५०
बाल विभाग- ५७५०, काव्य- १२००, इतिहास- १०५०, इंग्रजी- ४६० पुस्तके.