
करवाढ नसलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी
करवाढ नसलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी
शिरोळ नगरपरिषद; शिवरायांच्या पुतळा उभारणी कार्यवाहीची मागणी
शिरोळ, ता. २७ ः शिरोळ नगरपरीषदेच्या विशेष सभेत कोणतीही करवाढ नसलेला, सुधारीत व अंदाजित अंदाजपत्रकास मंजुरी दिली. विशेष सभेत ४५ कोटी ८९ लाख ९२ हजार ६६२ रुपयांच्या व दोन लाख ५१ हजार रुपये शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी दिली.
येथील पालिकेची विशेष सभा सोमवारी झाली. २०२२-२३ सुधारीत व २०२३-२४ चे प्रस्तावित अंदाजपत्रकावर चर्चा केली. २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात भांडवली जमा ३७ कोटी ३८ लाख ४ हजार ७९ जमा रक्कम अपेक्षित असून एकूण खर्च २८ कोटी ५४ लाख ७७ हजार ३४८ इतका आहे. २०२३-२०२४ आर्थिक वर्षात ४५ कोटी ८९ लाख ९२ हजार ६६२ इतकी रक्कम जमा व ४५ कोटी ८७ लाख ४१ हजार ६०० रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याचे अंदाजपत्रकात नमूद केले आहे.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते. उपनगराध्यक्षा जयश्री धर्माधिकारी, मुख्याधिकारी अभिजित हराळे, नगरसेवक प्रकाश गावडे, राजेंद्र माने, योगेश पुजारी, पंडित काळे, डॉ. अरविंद माने, श्रीवर्धन माने-देशमुख, इम्रान अत्तार, नगरसेविका कमलाबाई शिंदे, अनिता संकपाळ, सुनिता आरगे, विदुला यादव, करुणा कांबळे, सुरेखा पुजारी, कुमुदिनी कांबळे, कविता भोसले आदी उपस्थित होते. सर्वसाधारण सभेत शिवप्रेमींची मागणी लक्षात घेवून नगरपालिकेने शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेवक तातोबा पाटील यांनी केली.
---------
बारा विषयांना मंजुरी
अंदाजपत्रकाच्या सभेनंतर सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेचे वाचन संदीप चुडमुंगे यांनी केले. कल्लेश्वर तलावाच्या सुशोभिकरणातंर्गत कामातील बदलास मंजुरी घेणे, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील कामांना मुदतवाढ, मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, विविध योजनेतील चालू विकासकामाबाबत नागरिकांच्या तक्रारी व तांत्रिक अडचणीमुळे कामे रद्द करण्यासाठी मंजुरी घेणे, तसेच शासनाच्या मिळणाऱ्या निधीतून करण्यात येणाऱ्या शहरातील विकासकामांची निश्चिती करणे यासह बारा विषयांना सभेत मंजुरी दिली.