आंदोलन  अंकुश चा रास्ता रोको

आंदोलन अंकुश चा रास्ता रोको

‘आंदोलन अंकुश’तर्फे रास्ता रोको

शिरोळ-कनवाड रस्ताप्रश्नी बांधकाम विभागाचे अधिकारी धारेवर

सकाळ वृत्तसेवा
शिरोळ, ता. २० : नवीन मंजूर झालेला शिरोळ ते कनवाड रस्ता तातडीने सुरू करावा, अशी मागणी करत आज आंदोलन अंकुशतर्फे शिरोळ-कनवाड रस्त्यावर मध्यभागी चौकात रास्ता रोको केला. सार्वजनिक व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांचा गांधीगिरी पद्धतीने सत्कार केला. अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेतला.
आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राकेश जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मध्यभागी असणाऱ्या चौकात आज बारा वाजता ठाण मांडून रास्ता रोको केला. अधिकारी येऊन ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, पंचायत समिती बांधकाम विभागाचे प्रभारी अभियंता बदडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन लेखी म्हणणे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक आक्रमक झाल्याने त्यांचे कोणी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. अनेक वेळा लेखी व तोंडी सांगूनदेखील रस्ता दुरुस्तीचे काम केले जात नसल्याने अभियंता बदडे यांना धारेवर धरले आणि त्यांना कोल्हापुरी फेटा बांधून गांधीगिरी पद्धतीने सत्कार केला. सार्वजनिक बांधकामाचे उपअभियंता जहाँगीर बागवान यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन घालवाड फाटा ते कनवाड रस्त्याचे काम सध्या सुरू असून, ते तातडीने पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही दिल्याने आंदोलन मागे घेतले. पोलिस उपनिरीक्षक विश्वास कुरणे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला होता. विकास शेषवरे, कामिलबाबा इनामदार, भूषण गंगावणे, कृष्णात देशमुख, अक्षय पाटील, दीपक पाटील, प्रवीण माने, आनंदा भातमारे, अमर सावंत आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com