शेतकऱ्यांच्या फायद्याचे मॉडेल तयार करू

शेतकऱ्यांच्या फायद्याचे मॉडेल तयार करू

00897
शिरोळ ः डॉ. लारी वॉकर क्षारपड प्रकल्पाची पाहणी करताना.
---------------
शेतकऱ्यांच्या फायद्याचे मॉडेल तयार करू
डॉ. लॉरी वॉकर; दत्त कारखान्यातर्फे क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाची पाहणी
शिरोळ, ता. २६ ः सेंद्रिय कर्ब वाढ व क्षारपड जमीन होण्याची कारणमिमांसा शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानाच्या सिद्धतेवर काम करणे गरजेचे आहे. मिशिगन विद्यापीठ अमेरिका, सोमय्या विद्याविहार, विद्यापीठ मुंबई आणि श्री दत्त कारखाना यांच्यामध्ये सामंजस्य करार करून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा कसा होईल याचे आदर्शवत मॉडेल तयार करू. तसेच श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचे सेंद्रिय कर्ब वाढ आणि क्षारपड मुक्तीचे काम देशाला दिशादर्शक आहे, असे मत मिशिगन विद्यापीठ अमेरिकेचे निवृत्त कृषी शास्त्रज्ञ डॉ. लॉरी वॉकर यांनी व्यक्त केले.
श्री दत्त कारखान्याच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाची पाहणी, अभ्यास दौरा तसेच एकत्रित काम करण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. चेअरमन पाटील यांनी क्षारपड मुक्तीच्या कामामध्ये कारखान्यातर्फे अभ्यासासाठी सर्व सुविधा पुरवून नवीन संशोधन करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.
डॉ. वॉकर म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या सहभागातून आणि कारखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत केलेल्या प्रयोगातून सिद्ध झालेल्या माहितीच्या आधारे, नवीन प्रयोग आपण करू शकतो. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती कशी होईल, या दृष्टीने काम करणे महत्त्वाचे आहे. यासाठी एक निश्चित ध्येय समोर ठेवून शास्त्रीय दृष्टिकोनातून काम करण्यासाठी आपण इच्छुक आहोत.’
मिशिगन विद्यापीठ अमेरिकेच्या सहाय्यक शास्त्रज्ञ डॉ. लिसा टीमन, सोमय्या विद्याविहार विद्यापीठ मुंबईच्या सूक्ष्म जीवशास्त्रमधील संचालिका डॉ. पार्वती जे. आर., के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट फॉर अप्लाइड ॲग्री रिसर्च समीरवाडी, जिल्हा बागलकोटचे संचालक डॉ. नंदकुमार कुंथगे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुण्याचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग, पीएचडीच्या विद्यार्थिनी इशा पोपट, कृषा शाह, अर्थतज्ञ गीतालक्ष्मी हे पाहणी दौरा आणि चर्चासत्रात उपस्थित होते. कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, कारखान्याचे संचालक दरगू गावडे, भैय्यासो पाटील, माती परीक्षक ए. एस. पाटील आदी उपस्थित होते.
-------------
बांधावर जाऊन पाहणी
अभ्यास दौऱ्यात त्यांनी मजरेवाडी, अकिवाट, शिरोळ, शेडशाळ येथे सुरू असलेल्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी देऊन सर्व तांत्रिक बाजू समजावून घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com