राजू शेट्टींनी डॉ. मानेंना पाठबळ द्यावे

राजू शेट्टींनी डॉ. मानेंना पाठबळ द्यावे

शिरोळ ः शिरोळभूषण पुरस्काराचे मानकरी प्रा. अण्णासाहेब गावडे व धनाजी पाटील नरदेकर यांच्यासमवेत आमदार विनय कोरे व मान्यवर.
----------
राजू शेट्टींनी डॉ. मानेंना पाठबळ द्यावे
डॉ. विनय कोरे; शिरोळ भूषण पुरस्काराचे वितरण
शिरोळ, ता. २ ः शिरोळची भूमी ही ऐतिहासिक परंपरा लाभलेले भुमी असून या भूमीत जन्मलेल्या व्यक्तींनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा राज्य तसेच देशभर उमटवला आहे. दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनीही आपल्या कर्तुत्वाचा ठसा नाशिकच्या इगतपुरीपर्यंत उमटवला आहे. यामुळे त्यांना आमदार करण्यासाठी आमची भक्कम साथ असली तरी, माजी खासदार राजू शेट्टी यांनी, त्यांना पाठबळ द्यावे, असे आवाहन आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले.
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे संस्थापक चेअरमन, दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त दलित मित्र डॉ. अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान व शिरोळ नगरपरिषद यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिरोळ भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अजिंक्यतारा मंडळाचे अध्यक्ष धनाजी पाटील-नरदेकर आणि बाल शिवाजी मंडळाचे सचिव प्रा. आण्णासाहेब माने गावडे यांना शिरोळ भूषण पुरस्कार प्रदान केला. कोल्हापुरी मानाचा फेटा शाल व सन्मानचिन्ह मानपत्र, रोख अकरा हजार रुपये आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले. उपमहाराष्ट्र केसरी अमृता पुजारी, ज्यूडो स्पर्धेत सुवर्णपदक विजेती पवित्रा माने, भास्कर अवॉर्ड पुरस्कार प्राप्त युवा उद्योजक अभिजीत माने यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान केला.
आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, ‘दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांचे कार्य समाजाला दिशादर्शक आहे. त्यांनी हातकणंगले व शिरोळ तालुक्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आपली वाटचाल सुरू ठेवली आहे यामुळेच त्यांना जनतेचे पाठबळ मिळत आहे.’ माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले,‘दलित मित्र अशोकराव माने हे स्वकर्तृत्वावर उभे राहिलेले नेतृत्व आहे. त्यांनी आपल्या सर्व सहकारी संस्था आदर्शवत चालवल्या आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.’
नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी स्वागत केले. भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी प्रास्ताविक केले. विजय खातेदार यांनी आभार मानले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर प्रसिद्ध युवा कीर्तनकार शिवलीला पाटील यांचे कीर्तन झाले. अनिलराव यादव, बाजार समितीचे सभापती सुभाषसिंग रजपूत, माजी सरपंच शिवाजीराव माने देशमुख, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा नीता माने, नगरसेवक डॉ. अरविंद माने, सुहास राजमाने, बबन बन्ने, सागर कोळी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com