
शिरोली : यात्रा लेख
शिरोली पुलाची येथे पारंपरिक शिवजयंती, बिरदेव यात्रा व पीर अहमदसाहेब आणि पीर बालेचाँदसाहेब उरूस एकत्रित भरविण्याच्या संकल्पनेमुळे अलीकडे
या उत्सवास भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. तीन दिवस चालणारा उरूस व दोन दिवस चालणारी यात्रा व शिवजयंती यामुळे पाच ते सात दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोरोनाच्या महामारीनंतर होणाऱ्या उरूस व यात्रेमुळे नागरिकांच्या उत्साहास उधाण आलेले आहे.
-युवराज पाटील
उरूस, यात्रेचे बदलते स्वरूप उत्साहाचे..
येथील ग्रामदैवत म्हणून काशिलिंग बिरदेवाची ओळख आहे, परंतु पूर्वीपासून फक्त धनगर समाजातर्फे तीन वर्षांतून एकदाच जळाची यात्रा भरविली जायची.
तर प्रत्येक वर्षी पीर अहमदसाहेब व पीर बालेचाँदसाहेब यांचा उरूस सर्व शिरोलीकर साधेपणाने साजरा करत. शेतसारा वसुलीच्या वेळी ठराविक आणि उरुसासाठी वर्गणीरूपाने वसूल होते. त्यातूनच उरुसाचे गंध, गलेफ, नैवेद्य व आतषबाजी असे कार्यक्रम पार पाडले जायचे.
शिरोलीचे गावकामगार सर्जेराव दादा पाटील यांनी सर्वधर्मातील लोकांना एकत्रित करून पहिला उरूस केल्याचे सांगितले जाते. गावाच्या दक्षिणेस महामार्गालगत पंचगंगा नदीकाठावर असणारे पीर बालेचाँदसाहेब हे भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाते. आजही उरुसाच्या दिवशी होणाऱ्या गंध, गलेफाचा पहिला मान गावातील पोलिसपाटील घराण्यालाच आहे. गावाच्या पश्चिमेस पंचगंगा नदीकाठावर पीर अहमदसाहेब हे भाविकांचे दुसरे श्रद्धास्थान आहे.
उरूस भरविण्याची जबाबदारी गावातील सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या संघटनेची. जोतिबाची यात्रा संपल्यानंतर येणाऱ्याया पहिल्या बुधवारी पीर अहमदसाहेब यांना गंध व गलेफ व शुक्रवारी शर्यती, कुस्त्यांचे मैदान भरवून उरुसाची सांगता व्हायची. शर्यती हे उरुसाचे मुख्य आकर्षण असायचे. काळाच्या ओघात गावात दोन मतप्रवाह निर्माण झाले. उरुसाप्रमाणे ग्रामदैवत काळिलिंग बिरदेवाच्या यात्रेचे प्रतिवर्षी आयोजन झाले पाहिजे. ही संकल्पना युवकांनी रुजविली. यातूनच उरुसाला जोडूनच शनिवार व रविवारी यात्रा होऊ लागली. रविवारी काशिलिंग बिरदेवाला पेहराव, पालखी मिरवणूक व नैवेद्य करून उरूस व यात्रा यांची सांगता होऊ लागली. यात्रा व उरुसाची तारीख निश्चित करताना पारंपरिक शिवजयंतीची तारीख पाहून निश्चित केली जात आहे. शिवजयंतीमुळे गावातील वातावरण शिवमय असते, तसेच तरुणाईच्या उत्साहाला उधाण आलेले असते. यात्रा व उरूस भरविण्याची जबाबदारी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्थेकडे देण्याऐवजी ग्रामपंचायतीने स्वतःकडे घेतली. ग्रामपंचायत व यात्रा समितीतर्फे लोकवर्गणी जमा करून पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शर्यतीत घोडा व बैल या प्राण्यांना होणारी मारहाण, त्यामुळे शासनाने घेतलेली बंदी यामुळे शर्यतीचे प्रस्थ बंद झाले होते; मात्र या वर्षी पासून शर्यती पुन्हा सुरू झालेत. काही वर्षापासून कुस्त्यांचे जंगी मैदान यात्रा उरुसाचे मुख्य आकर्षण बनले आहे.
गेल्या वर्षीपासून गुरुवार ते रविवार सलग चार दिवस रोज रात्री करमणुकीच्या कार्यक्रमांची भर पडली आहे. त्यामुळे परंपरेला आधुनिकतेची सांगड घालत जुन्या-नव्या मतांचा एकत्रित विचार जोपासत कळत-नकळत यात्रा उरसात सकारात्मक बदल घडत आहेत. वाद टाळून सर्वांच्याच विचारांची धार्मिक व सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या शिरोलीकरांच्या प्रयत्नामुळे शिरोली गाव नवा आदर्श निर्माण करत आहे. त्यामुळे यात्रा उरुसाचे बदलते स्वरूप हवेहवेसे वाटणारे आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Srp22b02036 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..