
शिरोली : अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढण्याची शक्यता
अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढण्याची शक्यता
युवराज पाटील : सकाळ वृत्तसेवा
शिरोली पुलाची, ता. १० : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे निश्चित करून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ३१ मेपर्यंत करावे, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत; मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे २०२०-२१ व २०२१-२२ या दोन शैक्षणिक वर्षात शाळांना विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवता आलेली नाही. त्यामुळे २०२१-२२ च्या संचमान्यतेत अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांत कोरोनाचा मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला. ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण व शाळा चालू-बंद अशा संभ्रमावस्थेत शाळांना पूर्ण क्षमतेने विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवता आली नाही. त्यामुळे अनेक अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची पटसंख्या कमी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांची तात्पुरती संचमान्यता ३० डिसेंबर २०२१ रोजीच्या आधार क्रमांक नोंदणी असलेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे केली आहे. यानुसार राज्यात आधार क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८७ टक्के आहे. तसेच आधार जुळणी होत नसल्याने अनेक विद्यार्थी शाळेत व पटावर प्रत्यक्ष उपस्थित असूनही संचमान्यतेमध्ये दिसत नाहीत. ३१ मार्च २०२२ पर्यंत आधार क्रमांक नोंद केलेले विद्यार्थी संचमान्यतेकरिता ग्राह्य धरावेत व ही संचमान्यता अंतिम झाल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने समुपदेशन घेऊन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ३१ मेपर्यंत किंवा पूर्वी करावे, असे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत.
दोन वर्षांत शाळेच्या पटसंख्येत घट झाली आहे. तसेच संचमान्यतेसाठी आधार जोडणीतही अनेक तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी पटावर दिसत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे ठरवून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ३१ मेपर्यंत करावे, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत; मात्र पटसंख्याच खालावल्याने शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
---
कोट
राज्य सरकारने दोन वर्षे तरी संचमान्यता करून शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नये व पटसंख्या वाढवण्याची संधी द्यावी.
दौलत पाटील, कार्याध्यक्ष, शिवराज एज्युकेशन सोसायटी, टोप.
---
कोट
कोरोना काळात शाळा बंद असल्याने शाळांची पटसंख्या कमी झाली आहे. परिणामी, आता मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका आहे.
-सुरेश पाटील, अध्यक्ष, शिरोली हायस्कूल.
Web Title: Todays Latest Marathi News Srp22b02040 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..