
शिरोली : प्लास्टिक बंदी मोहिमेसाठी ‘एसयूपी-सीपीसीबी’ नावाचे अॅप तयार
प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी अॅप
युवराज पाटील : सकाळ वृत्तसेवा
शिरोली पुलाची, ता. १२ : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी व प्लास्टिक बंदी मोहिमेत लोकसहभाग वाढवण्यासाठी ‘एसयूपी-सीपीसीबी’ नावाचे अॅप तयार केले आहे. या माध्यमातून नागरिकांना प्लास्टिकच्या वस्तूंची विक्री, वापर, खरेदी, उत्पादनाबाबतच्या तक्रारी नोंदवता येणार आहे.
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल विभागाने प्लास्टिक बंदी मोहीम हाती घेतली आहे. एक जुलै २०२२पासून ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या एकेरी वापराच्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि २०२२च्या अखेरीसपर्यंत १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन टप्प्याटप्प्याने बंद करण्याची योजना आखली आहे. तसेच प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये इयरबड्स, फुगे, आइस्क्रीम काड्या, चमचे, कप, प्याले, झाकण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक यावरही बंदी घालण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘एसयूपी-सीपीसीबी’ अॅपसोबतच एक संकेतस्थळही सुरू केले आहे. यावर राज्य तसेच शहरी स्थानिक संस्था त्यांच्या अधिकार क्षेत्रातील एकेरी वापराच्या प्लास्टिकची स्थिती नोंदवू शकतात. एकेरी वापराच्या प्लास्टिक बंदीचे अनुपालन होत आहे किंवा नाही यावरही देखरेख ठेवता येणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने संकेतस्थळावर ‘क्यूआर’ कोड प्रसिद्ध केला आहे. तो स्कॅन केल्यानंतर हे अॅप स्वयंचलितपणे मोबाईलमध्ये समाविष्ट होणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘एसयूपी-सीपीसीबी’ अॅप सुरू केले असले तरीही त्याचा पर्याय राज्य मंडळाने अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेला नाही.
महाराष्ट्रात २०१८ मध्ये ५० मायक्रॉनवरील प्लास्टिकला बंदी घातली होती; पण प्लास्टिकला पर्याय शोधण्यात अपयश आल्याने राज्यात प्लास्टिक बंदी नावापुरती राहिली असून, प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे चित्र आहे.
---
कोट
प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी ‘एसयूपी-सीपीसीबी’ अॅप येत आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. यातून प्लास्टिकमुक्त भारत अभियानात सामान्य जनता सहभागी होऊ शकणार आहे.
-डॉ. सोनाली पाटील, माजी सभापती हातकणंगले, पंचायत समिती.
---
कोट
महाराष्ट्रात फसलेली प्लास्टिक बंदी पाहता देशस्तरावर प्लास्टिक बंदी लागू करण्याआधी नागरिकांना प्लास्टिकला पर्याय द्यावा.
-अमित शिंदे, उद्योजक
Web Title: Todays Latest Marathi News Srp22b02042 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..