शिरोली : दहा हजार शाळा-महाविद्यालयांत ‘स्टॅन्डर्ड क्लब’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोली : दहा हजार शाळा-महाविद्यालयांत ‘स्टॅन्डर्ड क्लब’
शिरोली : दहा हजार शाळा-महाविद्यालयांत ‘स्टॅन्डर्ड क्लब’

शिरोली : दहा हजार शाळा-महाविद्यालयांत ‘स्टॅन्डर्ड क्लब’

sakal_logo
By

शाळा, महाविद्यालयांत ‘स्टॅन्डर्ड क्लब’
औद्योगिक उत्पादनाच्या दर्जाबाबत विद्यार्थी करणार जनजागृती

युवराज पाटील : सकाळ वृत्तसेवा
शिरोली पुलाची, ता. १९ : केंद्र सरकारच्या अखत्यारितील भारतीय मानक संस्थेने (ब्युरो) देशातील दहा हजार हायस्कूल व महाविद्यालयांत ‘स्टॅन्डर्ड क्लब’ची स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. औद्योगिक उत्पादनाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, यासाठी या क्लबमधील प्रत्येकी १ शिक्षकासह ३० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर हे विद्यार्थी घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहेत.
केंद्राच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याच्या अखत्यारित भारतीय मानक संस्था कार्यरत आहे. औद्योगिक उत्पादनाच्या दर्जा तपासणीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, यासाठी या संस्थेने जून- २०२१ दरम्यान पथदर्शी प्रकल्प म्हणून ‘स्टॅन्डर्ड क्लब’ स्थापनेचा उपक्रम सुरू केला. पहिल्या टप्प्यात देशातील १ हजार हायस्कूल- महाविद्यालयात जनजागृतीचे लक्ष्य होते. मात्र, कोरोनामुळे जनजागृतीचे उपक्रम राबवताना अनेक अडचणी आल्या. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने २०२२ मध्ये आता दहा हजार हायस्कूल- महाविद्यालयात ‘स्टॅन्डर्ड क्लब’ची स्थापना करण्याचे लक्ष्य आहे. प्रशिक्षित शिक्षकाकडून त्या शाळेतील क्लबच्या ३० विद्यार्थी सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षित विद्यार्थ्यां त्यांच्या कुटुंबातील सदस्य, शेजारील नागरिक, नातेवाईकांपर्यंत औद्योगिक उत्पादनाच्या दर्जा तपासणीची माहिती देण्याचे काम करणार आहेत. त्यामुळे कमी दर्जाच्या वस्तूंबाबत सामान्यांना माहिती मिळेल आणि भविष्यात निम्न दर्जाच्या वस्तूंपासून सामान्यांची सुरक्षा होण्यास मदत होईल.
---
चौकट
सर्वोत्कृष्ट पाच विद्यार्थ्यांची होणार निवड
स्थापना झाल्यावर प्रत्येक क्लबमधील प्रत्येकी ५ विद्यार्थी निवडून औद्योगिक उत्पादनाच्या दर्जाच्या माहितीबाबत राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पाच विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना केंद्र सरकारच्या भारतीय मानक संस्थेकडून पुरस्कृत करण्यात येणार आहे.
---
कोट
औद्योगिक उत्पादनाच्या दर्जाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘स्टॅन्डर्ड क्लब’ स्थापन्याचा उपक्रम स्वागतार्ह आहे. क्लबच्या विद्यार्थ्यांकडून देण्यात येणारी माहिती सामान्य नागरिकांसाठी फायद्याची ठरणार आहे.
-मनिषा माने, जिल्हा परिषद सदस्या, भादोले