शिरोली : तंटामुक्त गाव समितीला घरघर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोली : तंटामुक्त गाव समितीला घरघर
शिरोली : तंटामुक्त गाव समितीला घरघर

शिरोली : तंटामुक्त गाव समितीला घरघर

sakal_logo
By

तंटामुक्त गाव समितीला घरघर
पुरस्कार, बक्षीस, खर्चाचे अनुदान सरकारकडून बंद

युवराज पाटील : सकाळ वृत्तसेवा
शिरोली पुलाची, ता. ३ : गाव पातळीवरील छोट्या कारणांवरून निर्माण होणाऱ्या तंट्यांचे पर्यवसान मोठ्या तंट्यात होऊ नये म्हणून लोकसहभागातून राबवण्यात येणाऱ्या ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती’चे पुरस्कार, बक्षीस व खर्चाचे अनुदान सरकारने बंद केले. त्यामुळे अनेक गावांतून समितीचे काम थांबले असून, ‘मोहिमे’ला घरघर लागल्याचे चित्र आहे.
गावपातळीवर शांतता नांदावी, गावपातळीवर छोट्या-छोट्या कारणांवरून निर्माण होणाऱ्या तंट्यांचे पर्यवसान मोठ्या तंट्यात होऊ नये, वादामध्ये मालमत्ता अडकून आर्थिक नुकसान होऊ नये, कुटुंबांची, समाजाची, गावाची शांतता धोक्‍यात येऊ नये, आवश्‍यक तेथे प्रशासनाची मदत घेऊन हे निवाडे केले जावेत, यासाठी स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या कल्पनेतून १५ ऑगस्ट २००७ ला ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम’ सुरू झाली. यामध्ये राज्यस्तरावर मुख्यमंत्री अध्यक्ष असलेली समिती, पालकमंत्री अध्यक्ष असलेली जिल्हा सल्लागार समिती, जिल्हास्तरीय कार्यकारी समिती, जिल्हाधिकारी अध्यक्ष, तालुका स्तरावर तहसीलदार, पोलिस ठाणे स्तरावर ठाणे अंमलदार, तर गावपातळीवर ग्रामसभेने ठरवलेले अध्यक्ष अशा सहा समित्या कार्यरत आहेत. यासाठी १५ ते ३० ऑगस्ट या कालावधीत ग्रामसभा घेऊन गावपातळीवरील तंटामुक्‍ती योजनेचे अध्यक्ष व सदस्यांची निवड केली जाते.
सुरवातीची सात-आठ वर्षे ही याजेना चांगली चालली. त्यामुळे गावपातळीवरील दिवाणी, महसुली, फौजदारी तंट्यासह सहकार, कामगार आदी क्षेत्रांतील तंटे सोडवण्यात यश आले. उल्लेखनीय काम करणाऱ्या तंटामुक्त गाव समितींना तसेच या योजनेचा प्रचार, प्रसार करणाऱ्या पत्रकारांना पुरस्काराने गौरवण्यात येत होते. त्यामुळे पुरस्कारासाठी का होईना मात्र गावात वाद वाढू देत नव्हते. परिणामी गावात शांतता नांदू लागली.
सरकारने २०१६-१७ पासून गावे तसेच पत्रकारांचे पुरस्कार देणे बंद केले आणि हळूहळू तंटामुक्त समितीचे काम कमी होऊ लागले. आज अनेक गावांत समितीचे काम कागदोपत्री सुरू असल्याचे चित्र आहे.
या मोहिमेतून आतापर्यंत २७,५५६ ग्रामपंचायतींपैकी १८९८९ ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाले आहेत. यासाठी आतापर्यंत ४८४ कोटी २७ लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. या योजनेत ८० टक्के गावांना पुरस्कार मिळाले असून ८,५६७ गावांना पुरस्कार मिळालेले नाहीत.

कोट
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतून गावांना पुन्हा पुरस्कार मिळावेत यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.
विजयसिंह माने, संचालक, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक.
-
कोट
तंटामुक्त समितीला सरकारकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे समितीचे काम म्हणजे घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या बडवण्याचा प्रकार होत आहे.
-शशिकांत खवरे, सरपंच, शिरोली पुलाची.

Web Title: Todays Latest Marathi News Srp22b02103 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..