शिरोली : घोषणेनंतर ऑनलाईन सर्वेक्षणाचा फार्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोली : घोषणेनंतर ऑनलाईन सर्वेक्षणाचा फार्स
शिरोली : घोषणेनंतर ऑनलाईन सर्वेक्षणाचा फार्स

शिरोली : घोषणेनंतर ऑनलाईन सर्वेक्षणाचा फार्स

sakal_logo
By

ऑनलाईन सर्वेक्षणाचा फार्स कशासाठी?
शालेय पाठ्यपुस्तकात वह्यांची कोरी पाने जोडण्याचा निर्णय आधीच

युवराज पाटील : सकाळ वृत्तसेवा
शिरोली पुलाची, ता. ३१ : शालेय पाठ्यपुस्तकात वह्यांची कोरी पाने जोडण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यापूर्वीच केली आहे. आता या बदलाच्या अनुषंगाने वास्तववादी माहितीच्या संकलनासाठीचे ऑनलाइन सर्वेक्षण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) करण्यात येत आहे. त्यामुळे मंत्र्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे पूर्वनियोजन झाले असून, सर्वेक्षण केल्याचा केवळ फार्स केला जात असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे.
शालेय शिक्षण विभागाचा नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून मंत्री केसरकर यांनी पुढील शैक्षणिक वर्षांपासूनच नव्या प्रकारची पुस्तके वितरित केली जाणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. या उपक्रमाची माहिती त्यांनी अनेक कार्यक्रमातून दिली आहे.
आता शालेय शिक्षण विभागाने शिक्षण मंत्र्यांकडून जाहीर झालेल्या निर्णयावर वास्तववादी माहितीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
शालेय शिक्षणात गरिबांच्या किंवा गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना वह्या विकत घेणे अनेकदा परवडत नाही. त्यामुळे त्यांचे शाळेमधील शिक्षण, वर्ग कार्य योग्य प्रकारे घडत नसल्याने पाठ्यपुस्तकांमध्येच वह्यांची पाने देण्याबाबतचे नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. पाठ्यपुस्तकातील वह्यांची पाने समाविष्ट करण्याची निकड जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे बालभारतीने सर्वेक्षणाच्या ऑनलाइन प्रश्नावलीत नमूद केले आहे. ही ऑनलाइन प्रश्नावली भरण्याचे आवाहन शिक्षकांना केले आहे. पाठ्यपुस्तकातील वह्यांच्या पानांनी वह्यांचा वापर थांबेल का, वह्यांच्या पानांवरील नोंदी विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील का, वह्यांच्या पानांचा वापर विद्यार्थी कशासाठी करतील, असे प्रश्न प्रश्नावलीत विचारले आहेत.
पुढील शैक्षणिक वर्षांपासूनच नव्या प्रकारची पुस्तके वितरित केली जाणार असल्याचे शिक्षण मत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मग निर्णय प्रक्रिया आणि नियोजन झाल्यावर वास्तववादी माहिती संकलित करण्याचे सर्वेक्षण करून उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
---
चौकट
माहिती भरताना होतेय ‘ऑटो टिक’
बालभारतीकडून सर्वेक्षणाद्वारे माहिती मागवली आहे. मात्र, सर्वेक्षणाच्या प्रश्नावलीत माहिती भरताना ‘ऑटो टिक’ होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे निर्णयाच्या अंमलबजावणीचे पूर्वनियोजन झालेले आहे. सर्वेक्षणाचा केवळ फार्स केल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.
---
कोट
कोणत्याही उपक्रमाची घोषणा करण्यापूर्वी त्याचे सर्वेक्षण करणे गरजेचे होते. मात्र, घोषणेनंतर सर्वेक्षणातून शालेय शिक्षण विभागाच्या अजब कारभाराचा नमुना समोर आला आहे.
सुरेश पाटील, अध्यक्ष, शिरोली शिक्षण प्रसारक मंडळ.