शिरोली : शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोली : शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी
शिरोली : शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी

शिरोली : शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी

sakal_logo
By

जिल्ह्यातील ४८ शाळांत
होणार डिजिटल लायब्ररी

युवराज पाटील : सकाळ वृत्तसेवा
शिरोली पुलाची, ता. २६ : राज्यातील एक हजार ५२५ शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी तयार करण्यात येणार आहेत. स्टार्स प्रकल्पांतर्गत निवडलेल्या शाळांमध्ये डिजिटल वाचनालय स्थापित करण्यासाठी टॅब्लेट, आवश्यक हार्डवेअर व सॉफ्टवेअर पुरविण्यासाठी तब्बल २५ कोटी ६२ लाखांची तरतूदही केली. जिल्ह्यातील ४८ शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी उभारण्यात येणार आहे.
राज्याचा शैक्षणिक स्तर तसेच परफॉर्मिंग ग्रेडिंग इंडेक्स वाढविण्यासाठी राज्यात पाच वर्षांपासून ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ अभियान सुरू आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून २०२२-२३ या आर्थिक वर्षात हा ‘स्टार्स प्रकल्प’ सुरू केला. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत मुलांच्या वाचनात भर पडण्यासाठी व त्यांना विविध विषयांची पूरक वाचनाची ई-पुस्तके देऊन त्यांच्यात शैक्षणिक संपादणूक पातळी वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने डिजिटल वाचनालय हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि शासकीय शाळांमध्ये आधुनिक पद्धतीने अध्ययन-अध्यापन व्हावे, यासाठी डिजिटल लायब्ररीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे पुस्तकांबरोबरच टॅब पुरवून विद्यार्थ्यांना भरपूर अवांतर वाचन करण्याची सुविधा दिली जाईल.
स्टार्स प्रकल्पांतर्गत निवडलेल्या शाळांना टॅबचे वाटप केले जाणार आहे. इंडस एज्युट्रेन कंपनीद्वारे हे टॅब शाळांपर्यंत पोचविले जातात. टॅब प्राप्त करून घेण्यासंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी जिल्हा परिषद, पालिकांना सूचना दिल्या आहेत. सोबतच डिजिटल लायब्ररीसाठी आयसीटी लॅबप्रमाणे वर्गखोली, वीजपुरवठा, फर्निचर आणि इंटरनेट नेटवर्क उपलब्ध करण्याचेही निर्देश दिले आहेत.

चौकट
पटसंख्येचा निकष निश्चित
शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी उभारताना टॅब्लेट पुरविण्यासाठी पटसंख्येचा निकष निश्चित केला आहे. १०० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या एक हजार २५५ शाळांना केवळ दहा टॅब्लेट, तर १०० पेक्षा जास्त पटसंख्या असणाऱ्या २७० शाळांना २० टॅब्लेट दिले जाणार आहेत.
---
कोट
डिजिटल लायब्ररी उभारण्यासाठी टॅब्लेट देण्याचा शासनाचा निर्णय अभिनंदनीय आहे. डिजिटल लायब्ररीच्या देखभाल दुरुस्तीसाठीही शासनाने निधीची तरतूद करावी.
- आर. एस. पाटील, अध्यक्ष, सूर्योदय शिक्षणप्रसारक मंडळ, शिरोली पुलाची