शिरोली : स्मार्ट अंगणवाडीची घोषणा हवेतच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोली : स्मार्ट अंगणवाडीची घोषणा हवेतच
शिरोली : स्मार्ट अंगणवाडीची घोषणा हवेतच

शिरोली : स्मार्ट अंगणवाडीची घोषणा हवेतच

sakal_logo
By

स्मार्ट अंगणवाडीची घोषणा हवेतच

युवराज पाटील : सकाळ वृत्तसेवा
शिरोली पुलाची, ता. ५ : सौर ऊर्जेवर चालणारी विद्युत यंत्रणा, ई-लर्निंगची सुविधा, एलईडी टीव्ही, यूएसबी पोर्टल, मुलांसाठी टेबल, खुर्ची, जल शुद्धीकरण यंत्र, इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे अशी अद्यावत उपकरणे आणि सुविधांनी सुसज्ज अशा स्मार्ट अंगणवाडी तयार करण्याची घोषणा राज्य सरकारने पाच वर्षांपूर्वी केली. मात्र, त्यासाठी निधीच उपलब्ध झालेला नाही. परिणामी ही घोषणा हवेतच विरली आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महिला व बालकल्याण विकास विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी राबवली जाते. या योजनेतून अंगणवाडीतील शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचा भौतिक, शारीरिक आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे ध्येय आहे. राज्यात सध्या ९७ हजार अंगणवाड्या असून, यात दोन लाख अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ० ते ६ वयोगटांतील सुमारे ८० लाख बालकांना सेवा दिली जाते. या मुलांना पोषणयुक्त आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, आरोग्य शिक्षण, औपचारिक शालेय शिक्षण केंद्रातून देण्याचा प्रयत्न आहे.
या अंगणाड्यांची स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने आदर्श अंगणवाडी अर्थात स्मार्ट अंगणवाडीची घोषणा केली होती. यातून अंगणवाड्यांना रंगकाम केलेल्या बोलक्या भिंती, अंतर्गत भिंतींवर केलेली सजावट, पाण्यापासून ते आसन व्यवस्थेपर्यंत असणाऱ्या दर्जेदार भौतिक सुविधा, मुलांना खेळण्यासाठी मैदान, बैठे खेळाचे विविध साहित्य असा ‘स्मार्ट साज’ देण्यात येणार होता. त्यासाठी अंगणवाडीच्या नावांचे प्रस्ताव सरकारकडे पाठविला होते. मात्र, त्यावर कार्यवाही झालेली नाही.
---
अशी असेल स्मार्ट अंगणवाडी
वॉटर प्युरीफायर, सिलींग फॅन, धान्य कोठी, कारपेट, ग्रीन बोर्ड, घसरगुंडी, डुलता घोडा, ई-लर्निंग साहित्य, अंगणवाडी अंतर्गत व बाह्य रंगकाम, बोलक्या भिंती, छत दुरूस्ती, भिंतीची दुरूस्ती व डागडूजी, दरवाजा व खिडक्या दुरूस्ती, लायब्ररी रॅक आदी सुविधा देण्यात येतील.
---
कोट
स्मार्ट अंगणवाडी प्रकल्पासाठी शासनाने भरीव निधीची तरतूद करावी. जास्तीत जास्त अंगणवाड्या स्मार्ट व्हाव्यात यासाठी पाठपुरावा करणार आहे.
आमदार जयश्री जाधव
---
कोट
अंगणवाडी हे ग्रामस्तरावरावरील समाज विकासाचे प्रभावी केंद्र बनू शकते. अंगणवाड्यांना भौतिकदृष्ट्या अद्यावत केल्याने शैक्षणिक वातावरण निर्मिती होऊन बालकांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो.
पद्मजा करपे, सरपंच, शिरोली पुलाची