
रयत तर्फे राहीबाई पोपरे गणपतराव देशमुख याना 9 ला पुरस्कार प्रदान होणार
गणपतराव देशमुख यांना
मरणोत्तर कर्मवीर पुरस्कार
राहीबाई पोपेरेंना लक्ष्मीबाई पाटील पुरस्कार
सातारा, ता. ६ : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६३ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (ता. ९) सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार (कै.) भाई गणपतराव देशमुख यांना मरणोत्तर देण्यात येणार आहे. रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार राहीबाई पोपेरे व दिलीप वळसे- पाटील यांना इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कर्मवीर पुण्यतिथीचे औचित्य साधून संस्थेतर्फे समाजाच्या विकासासाठी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस दिला जाणारा ‘पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ या वर्षी माजी मंत्री व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष (कै.) भाई गणपतराव देशमुख यांना मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप अडीच लाख रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे असून, हा पुरस्कार त्यांच्या पत्नी श्रीमती रतनबाई देशमुख या स्वीकारणार आहेत.
संस्थेकडून दर वर्षी दिला जाणारा ‘रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ कोंभाळणे (जि. नगर) येथील बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांना दिला जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रुपये अडीच लाख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे असून, त्या स्वतः उपस्थित राहून हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
संस्थेमार्फत दर वर्षी दिला जाणारा ‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार’ या वर्षी संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांना देण्यात येणार असून, पंचवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय रयत शिक्षण संस्थेला २५ लाखांपेक्षा जास्त देणगी देणाऱ्या थोर देणगीदारांचा सत्कार चांदीचे सन्मानचिन्ह देऊन केला जाणार आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून वर्ग- एकपदी निवड झालेल्या अधिकारी विद्यार्थ्यांचा, राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा, विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थी व कर्मवीर पारितोषिक मिळविलेल्या शाखांच्या प्रमुखांचा सन्मान खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी केले आहे.
16934
गणपतराव देशमुख
Web Title: Todays Latest Marathi News Stj22b13616 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..