
सुगडी बनविण्यासाठी कुंभारवाड्यात लगबग
पन्हाळ्यात सुगड निर्मितीला गती
सातवे : मकरसंक्रांत काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यानिमित्त पन्हाळा तालुक्यातील गावोगावी कुंभारवाड्यात सुगडी बनविण्याच्या कामांना गती आली आहे. सुगडीबरोबर लोटकी, बोळकी मोठ्या संख्येने बनविले जातात. १४ जानेवारीला मकरसंक्रांत आहे. गतवर्षाप्रमाणे १०० ते १२५ रुपयांपर्यंत खणाची विक्री अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. यंदा परतीच्या पावसामुळे पन्हाळा पूर्व भागात दिवाळीनंतर सुगडी बनविण्यासाठी विलंबाने सुरुवात झाली. सुहासिनी कुंभारवाडा किंवा आठवडा बाजारात ५ सुगडाचा एक खण, ५ लोटक्याचा एक खण किंवा ५ बोळक्याचा एक खण जसा महिलेचा वाण असतो त्याप्रमाणे खण खरेदी करतात. बाजारातून घरी खण आणल्यानंतर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला भोगीदिवशी देवघरासमोर प्रत्येक सुगडीत ज्वारीचे कणीस, उसाचे तुकडे, बोरे, हरभरा, ढाळे, तीळ आदी वाणाचे साहित्य घालून पूजा केली जाते. मकरसंक्रांतीला सुहासिनी महिला सुगडी घेऊन मंदिरात देव-देवतांचे दर्शन घेतात. त्यानंतर सुहासिनी एकमेकींना हळदी-कुंकू देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा देतात.