
शेतकऱ्यांचे पाणी नियोजन
फोटो ः ००९८३, ००९८५
...
ग्राउंड रिपोर्ट
...
वारणा नदी उशाशी; पण शेतकरी उपाशी
विजेची अनियमितता ः पीक पाण्याअभावी करपते, शेतकऱ्यांना नुकसान
दिनकर पाटील : सकाळ वृत्तसेवा
सातवे, ता. २० : वारणा नदीला बारमाही पाणी; पण अपुरा विद्युतपुरवठा आणि नियोजनाच्या अभावामुळे ऐन उन्हाळ्यात पिकांची बेसुमार हानी होत आहे. त्यामुळे ‘वारणा उशाशी; पण शेतकरी उपाशी’ अशी स्थिती वारणा परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांची झाली आहे. महावितरणने शेतीसाठी दिवसा बारा तास वीज उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आता आंदोलने आकारास येण्याची शक्यता आहे.
वारणा नदीवर चांदोली धरण झाल्यानंतर १९८५ पासून वारणा नदी बारमाही वाहू लागली. तत्पूर्वी, वारणाच्या परिसरात भात, भुईमूग, ज्वारी आदी खरीप व गहू, हरभरा अशी रब्बी पिके घेतली जात होती. विहिरीतील पाण्याच्या आधारे केवळ १० टक्के उसाचे पीक घेतले जात होते. दीपावलीनंतर ‘वारणामाई’ कोरडी असायची. त्यामुळे काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत होती. सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी वारणा नदीवर १४ ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले. त्यामुळे ऊस पिकाला उभारी मिळाली, वारणा परिसर सुजलाम् सुफलाम् झाला.
-----
खडकाळ जमिनीतही ऊस उभारला
वारणा नदी बारमाही वाहू लागल्यानंतर वारणाकाठच्या शेतकऱ्यांनी खासगी, सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतीसाठी पाण्याच्या योजना राबविल्या. शेतकऱ्यांनी एकरी लाखो रुपयांच्या कर्जांची परतफेड केली. विहिरींनाही मोठे पाणी प्राप्त झाले. बागायती क्षेत्र झाल्याने नगदी म्हणून गणलेल्या उसाकडे शेतकरी आकर्षित झाले. खडकाळ जमिनीतही शेतकरी ऊस पीक घेऊ लागल्याने ऊस क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांची संख्या वाढलीच; पण अलीकडच्या काही वर्षांत साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविली.
------
विजेचा मेळ लागेना, पीक तग धरेना
हुकमी पीक म्हणून ऊस पीक शेतकरी घेत आहेत. मात्र, महावितरणकडून शेतकऱ्यांना केवळ आठच तास विद्युतपुरवठा होतो तोही महिन्यातून पंधरा दिवस दिवसा आणि पंधरा दिवस रात्री होत असल्याने शेतकऱ्यांना विहिरीत आणि नदीत पाणी असूनही पिकांना देता येत नाही. शेतकऱ्यांना दिली जाणारी वीज पुरेशी नाही. ती दिवसा दहा ते बारा तास मिळावी, अशी मागणी शेतकरी वारंवार करीत आहेत. रात्री वीज वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना नदीवर, विहिरीवर रात्रीच्यावेळी फेऱ्या माराव्या लागतात.
--------
प्राण्यांचा धोका ...
नदीकाठी मगरी, तरस, रानडुकरे, सर्प हे प्राणी निदर्शनास येतात. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण असूनही पिकांना जीवदान देण्यासाठी ते स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रीच्यावेळी शेतात पाणी देण्यासाठी जातात. विविध कारणांमुळे विद्युत खंडित होते. त्या मोबदल्यात दुसऱ्या दिवशी विद्युतपुरवठा वाढवून दिला जात नाही. रात्रीही कायमस्वरूपी वायरमन असल्यास विद्युतपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.
---------
कोट
‘महावितरणने शेतकऱ्यांसाठी दिवसा बारा तास वीजपुरवठा करावा. वारंवार विद्युतपुरवठा खंडित होणार नाही याचीही दक्षता घ्यावी.
- दीपक पाटील, शेतकरी
....
कोट
‘सातवे आणि परिसरातील विद्युतपुरवठा खंडित होतो. याची कारणे शोधली जातील. रात्री कायमस्वरुपी वायरमन नेमण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करू.
- नीलेश पोवार, कनिष्ठ अभियंता, महावितरण