
धावपट्टीच्या सुरक्षेला चारचाँद
29496
उजळाईवाडी ः विमानतळावरील विस्तारित धावपट्टी दगडी पिचिंगमुळे धावपट्टी मजबूत व टिकाऊ बनली आहे.
दगडी पिचिंगचे काम पूर्ण
कोल्हापूर विमानतळावर नव्याने बांधलेल्या धावपट्टीला मिळणार सुरक्षा
महादेव वाघमोडे ः सकाळ वृत्तसेवा
उजळाईवाडी, ता. १४ ः कोल्हापूर विमानतळावर नव्याने बांधण्यात आलेल्या धावपट्टीला सुरक्षा पुरवण्यासाठी दगडी पिचिंगचे काम पूर्ण झाले आहे. धावपट्टीचे आत्तापर्यंत २३०० मीटर पैकी १९७० मीटर बांधकाम पूर्ण झाले आहे. सध्या विमानांचे संचालन सुरू असणारी धावपट्टी १३७० मीटर असून, तत्कालीन भौगोलिक परिस्थितीनुसार सदर धावपट्टी सपाट माळावर तयार केली होती. नुकतेच या धावपट्टीचे डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परीक्षण झाले असून, याचा अहवाल प्रतीक्षेत आहे. अहवालानंतर नव्याने तयार झालेली धावपट्टी कार्यान्वित होण्याची शक्यता असून, यामुळे मोठी विमाने व नाईट लँडिंगसारख्या सुविधा विमानतळावर सुरू होतील.
नव्याने बांधलेल्या धावपट्टीसाठीची संपादित जमीन उंच-सखल असल्यामुळे येथे भराव टाकून जमिनीचे सपाटीकरण केले आहे. सदर भराव टाकण्याचे काम दोन ठेकेदारांकडून दोन वर्ष सुरू होते. काही ठिकाणी दरी इतकी मोठी होती की तब्बल ८२ फुटापर्यंत भराव टाकून नवीन धावपट्टी जुन्या धावपट्टीशी समपातळीवर केली आहे.
या धावपट्टीच्या सुरक्षेसाठी वादळ, वारा व पावसामुळे किंवा इतर नैसर्गिक व अनैसर्गिक कारणांमुळे भराव खचू नये, यासाठी दगडी पिचिंग केले आहे. हे अनेक स्तरावर करण्यात येत आहे. या पिचिंग केलेल्या कामावर झाडे-झुडपे उगवून खराब होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते. पाण्याचा निचरा होण्यासाठी क्युट ड्रेन अर्थात ठराविक अंतरावर पाण्याचा निचरा होण्यासाठी गटर्स बांधले आहेत. तसेच संपूर्ण धावपट्टीला मजबूत तारेच्या कुंपणाने बंदिस्त केले असून, यामुळे मनुष्य अथवा प्राण्यांना या धावपट्टीवर प्रवेश करता येत नाही. परंतु, पूर्व बाजूला अतिरिक्त ६४ एकर भूसंपादनानंतर २३०० मीटर पर्यंत धावपट्टीचे विस्तारीकरण काम करण्यात येणार असल्यामुळे पूर्वेकडे सदर पिचिंगचे काम केलेले नाही. तसेच
अँप्रन व अँप्रन वेवेलाही दगडी पिचिंग केले आहे.
दृष्टिक्षेपात...
-८२ फुटांपर्यंत भराव टाकून धावपट्टीचे विस्तारीकरण
-नव्या धावपट्टीला दक्षिण व उत्तर बाजूस पिचिंग
-मजबूत आणि टिकाऊ बांधकाम
-एकूण प्रस्तावित धावपट्टीः २३०० मीटर
-जुन्या धावपट्टीची लांबीः १३७० मीटर
-नव्याने विस्तारित धावपट्टीची एकूण लांबीः १९३० मिटर
चौकट
नाईट लँडिंग व बोईंग विमाने उतरणार
नव्याने तयार झालेल्या धावपट्टीची डीजीसीएच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. यानंतर कोल्हापूर विमानतळावरील विमानांची वर्दळ वाढणार असून, यामध्ये मोठी बोईंग विमाने उतरण्यासाठी धावपट्टी तयार असेल. नाईट लँडिंगमुळे कोल्हापूर विमानतळावर अहोरात्र विमानांचे संचालन शक्य झाल्यामुळे विमानतळाचा विकास होण्यास मदत होणार आहे. तसेच देशातील प्रमुख शहरांना कोल्हापूरची विमानाने जोडता येणे शक्य होणार आहे.
कोट
विमानतळावर प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून, या बाबतीत कोणतीही तडजोड केली जात नाही. धावपट्टीच्या सुरक्षेसाठी धावपट्टीची पिचिंग काम केले असून, संपूर्ण धावपट्टीला यामुळे विशेष सुरक्षा प्राप्त झाली आहे.
-कमलकुमार कटारिया, संचालक, कोल्हापूर विमानतळ
Web Title: Todays Latest Marathi News Ujl22b01298 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..