
गांधीनगर प्रादेशिक योजनेच्या अभय योजनेला मुदतवाढ
गांधीनगर प्रादेशिक योजनेच्या
अभय योजनेला मुदतवाढ
व्याजात मिळणार शंभर टक्के सूट
सकाळ वृत्तसेवा
उजळाईवाडी, ता. २६ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या वैयक्तिक व संस्थात्मक ग्राहकांसाठी अभय योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याअंतर्गत शंभर टक्के व्याज सवलत मिळणार आहे.
कोल्हापूर प्रादेशिक गांधीनगर व इतर १३ गावांची नळ पाणीपुरवठा योजना चालवली जाते. योजनेतील लाभार्थी असणाऱ्या बहुतांश ग्राहकांनी अद्यापही थकीत पाणीपट्टी भरलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर १५ कोटी ९७ लाखांहून अधिक रकमेची मोठी थकबाकी वाढलेली आहे. थकबाकीदार ग्राहकांची रक्कम शून्यावर आणण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने २०२२ जानेवारीपासून अभय योजना अमलात आणली आहे. त्या अनुषंगाने ग्राहकांकडे पाणीपट्टी थकबाकी असलेल्या रकमेपैकी मुद्दल रक्कम एकाच वेळी ग्राहकांनी भरल्यास त्यांच्यावर लावलेले व्याज १०० टक्के माफ केले जाणार आहे. प्रादेशिक गांधीनगर व इतर १३ गावे, पाणीपुरवठा योजनेअंतर्गत एकूण ११ ग्रामपंचायती, १४० औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहक, तसेच ११८६ वैयक्तिक निवासी थकबाकीदार आहेत.
जानेवारी २३ पर्यंत ४३२ ग्राहकांनी या योजनेच्या लाभ घेतला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अमित पातळवट यांनी दिली. या योजनेमध्ये भाग घेण्याची मुदत ३० एप्रिल २०२२ पर्यंत होती, पण ग्राहकांना वेळ मिळावा याकरता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी पुन्हा एक पाऊल पुढे टाकत ३१ मार्च २३ पर्यंत अभय योजनेला मुदतवाढ दिली आहे. थकबाकीदार असलेल्या ग्राहकांनी या योजनेत भाग घेण्याचे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता पाथरवट, उपविभागीय अभियंता ए. डी. चौगुले यांनी केले आहे. -----------------
चौकट
...तर पाणीपुरवठा बंद करणार
३१ मार्चनंतर थकबाकी न भरणाऱ्या ग्रामपंचायत व इतर ग्राहकांवर कठोर कारवाईचा बडगा उभारण्यात येणार असून, प्रतिसाद न देणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात संबंधित ग्रामपंचायतच्या नागरिकांना पाण्यासाठी वन -वन करावी लागण्याची शक्यता आहे.