
उमरग्याच्या औद्योगिक वसाहतीतील जोगेश्वरी ब्रेव्हरीज कंपनीवर "ईडी" ची कारवाई
01144
जकेकूर (ता. उमरगा) : येथे औद्योगिक वसाहतीतील जोगेश्वरी ब्रेव्हरीज कंपनी.
‘जोगेश्वरी ब्रेव्हरीज’ ची
४५ कोटींची मालमत्ता जप्त
ईडीची कारवाई; कंपनीची नोंदणी कोल्हापुरातील
उमरगा, ता. ८ : येथील औद्योगिक वसाहतीमधील जोगेश्वरी ब्रेव्हरीज कंपनीच्या मालमत्तेवर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई करून ४५ कोटी ५० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. दरम्यान, या कंपनीची कोल्हापुराला नोंदणी असून, दारू निर्मिती क्षेत्रात कंपनी काम करते.
शहराजवळील जकेकूर शिवारातील औद्योगिक वसाहतीत कोल्हापूर येथील उमेश धोंडीराम शिंदे यांनी जोगेश्वरी ब्रेव्हरीज कारखान्याची उभारणी केली. मात्र, एकदाही बिअरचे उत्पादन झाले नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. गेली चार पाच वर्षे कंपनी बंद आहे. शुक्रवारी (ता. आठ) ईडीच्या ट्वीटर हॅंडलवरून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील उमेश धोंडीराम शिंदे व देवेंद्र उमेश शिंदे हे पिता-पुत्र संचालक असलेली जोगेश्वरी ब्रेव्हरीजची मालमत्ता व मशिनरी जप्त केली. ही कारवाई मनी लॉँड्रिंग कायदा २००२ अंतर्गत केल्याचे नमूद केले आहे. कंपनी कायद्यांतर्गत जोगेश्वरी ब्रेव्हरीज प्रायव्हेट लिमिटेड ५ मार्च २००९ ला नोंदणीकृत आहे. त्यानुसार १५ कोटी शेअर कॅपिटल व दोन कोटी पेड कॅपिटल आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची शेवटची बैठक ३० नोव्हेंबर २०२१ ला झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कंपनीच्या ठिकाणी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने भेट देऊन पाहणी केली असता तेथे एक रखवालदार होता. त्याचा पगार कोल्हापूर येथून होतो, अशी माहिती त्याने दिली. कंपनीला कोणत्याही अधिकाऱ्याने भेट दिली नाही आणि कंपनी सीलसुद्धा केलेली नाही असे रखवालदाराने सांगितले. परंतु, तूर्त ईडीने कागदोपत्री कारवाई केल्याने ही माहिती समोर आली आहे.
वादळी वाऱ्याने मशिनरी कोलमडली
औद्योगिक वसाहत झाल्यानंतर पहिल्यांदा या कंपनीने बांधकामासह मशिनरी उभारणीचे काम सुरू केले होते. काम गतीने पूर्ण झाले. धान्यापासून मद्य (बिअर) निर्मिती करणाऱ्या कंपनीचे प्रॉडक्ट मात्र बाहेर आले नाही. याला बॉयलरमधील बिघाड प्रमुख कारण असल्याची माहिती सांगण्यात येते. ३१ मे २०१८ ला झालेल्या वादळी वाऱ्यात कंपनीचे मोठे नुकसान झाले. जवळपास पाच वर्षांपासून कंपनी बंद आहे. मालमत्ता भंगार अवस्थेत दिसत आहे. यातून ४५ कोटी कसे मिळणार, हा प्रश्न आहे; परंतु, ईडीच्या हाती आलेल्या पुराव्यानुसार ही कारवाई झाली असावी, असे दिसते.
Web Title: Todays Latest Marathi News Umr22a00661 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..