
आज-यात वारकरी कीर्तन संमेलनाचे आयोजन.
आजऱ्यात २१ ला वारकरी कीर्तन संमेलन
आजरा ता. १४ ः आजऱ्यातील वारकरी कीर्तन संमेलन राज्यातील क्रांतिकारक पाऊल असेल. २१ डिसेंबरच्या संमेलनात दिग्गज कीर्तनकार उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष सुनील शिंत्रे, संपत देसाई यांनी पत्रकार बैठकीत दिली.
२१ डिसेंबरला स. १० ते सायं. ६ पर्यंत बाजार मैदानात संमेलन असेल. सकाळी ९ वाजता दिंड्या निघतील. यामध्ये १ हजार वारकरी सहभागी असतील. गाथा व ज्ञानेश्वरीचे पूजनाने संमेलनाची सुरुवात होईल. तीन सत्रांत संमेलन होणार असून पहिल्या सत्रात अर्थतज्ञ, ज्ञानेश्वर माऊली संस्थान, आळंदीचे विश्वस्त अभय टिळक यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळाचे राजाभाऊ चोपदार प्रमुख पाहुणे, सुप्रसिद्ध कीर्तनकार मुंबईतील शामसुंदर सोन्नर महाराज संमेलनाध्यक्ष आहेत तर आजरा कारखाना अध्यक्ष सुनील शिंत्रे स्वागताध्यक्ष असतील.
दुसऱ्या सत्रात परिसंवाद सचिन परब, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून देवदत्त परुळेकर (वेंगुर्ला), संपत देसाई (आजरा), धम्मर्किर्ती महाराज (परभणी), ज्ञानेश्वर बंडगर(सांगोला) व ताई महाराज मंगळवेढेकर यांचा सहभाग राहील. तिसऱ्या सत्रात दुपारी ३ ते ५ मध्ये डॉ. सुहास फडतरे महाराज (सातारा) यांचे कीर्तन यानंतर समारोप व दिंडी प्रमुखांचा सत्कार होईल. अध्यक्षस्थानी गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर आहेत. बैठकीला राजाभाऊ शिरगुप्पे, मुकुंद देसाई,संजय घाटगे, युवराज पोवार,नवनाथ शिंदे यांच्यासह संयोजन समिती सदस्य उपस्थित होते.