
वडणगे -टपाल विभागाच्या अपघाती संरक्षण विमा योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद
‘टपाल’ विम्याने गाठला
४४ हजारांवर पल्ला
लाभार्थी वाढले; जिल्ह्यातून प्रतिसाद
सुनील स. पाटील : सकाळ वृत्तसेवा
वडणगे, ता. ४ : टपाल विभागाने सर्वसामान्यांना दिलेल्या १० लाखांच्या अपघाती विमा कवच योजनेला कोल्हापूर जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यातील ४४ हजार २४३ नागरिकांनी हा विमा उतरवला आहे. ग्रामीण विभागातून योजनेला अधिक प्रतिसाद आहे.
टपाल विभागाने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी २९९ व ३९९ रुपयांच्या वार्षिक हप्त्यामध्ये १० लाखांची अपघात संरक्षण विमा योजना एक जुलै २०२२ ला आणली. योजना १८ ते ६५ वर्षे वयोगटांतील व्यक्तींसाठी आहे. विमा धारकाचा मृत्यू, अपंगत्व व कायमचे आंशिक अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. अपघात झाल्यास रुग्णालयाचा ६० हजार खर्च, बाह्यरुग्ण खर्चास ३० हजार रुपयापर्यंत दावा करता येतो.
रुग्णालयात असल्यास दहा दिवसांसाठी प्रतिदिन एक हजार रुपये विमा धारकांना मिळतात. कुटुंबाला रुग्णाच्या वाहतुकीसाठी २५ हजार रुपये खर्च दिला जातो. अपघाती मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी पाच हजार रुपये व विम्यातंर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये दिले जातात. २९९ रुपयांच्या विमा योजनेला शिक्षण खर्च, वाहतूक खर्च, अंत्यसंस्कार खर्च लागू होत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात टपाल विभागाने या योजनेची व्यापक जनजागृती केली आहे. अनेकांना या योजनेचा लाभ झाला आहे.
---------
कोट
टपाल खात्याने अगदी स्वस्तात विमा कवच दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या विमा योजनेला प्रतिसाद मिळत आहे. अजूनही ज्या नागरिकांनी हा विमा उतरवलेला नाही त्यांनी त्वरित तो उतरवून आपले व कुटुंबीयांचं जीवन सुरक्षित करावे. विमा उतरवण्यासाठी आपल्या नजीकच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधावा.
- अर्जुन इंगळे, अधीक्षक डाकघर, कोल्हापूर
----------
विभागनिहाय संख्या...
उपविभाग*विमा उतरलेल्यांची संख्या
गडहिंग्लज*६७७६
गारगोटी*५५५३
इचलकरंजी*६९३०
कागल*८९२१
कोल्हापूर उत्तर*७२९७
कोल्हापूर पश्चिम*८७६६