
सहकारी संस्थांना प्रशिक्षण
03492
सहकार भारतीचे कार्य
कौतुकास्पद : काकडे
सहकारी संस्थांना प्रशिक्षण कार्यक्रम
वारणानगर, ता. २७ : सहकाराच्या प्रगतीसाठी सहकार भारती करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी कोल्हापूर येथे केले. सहकार भारती कोल्हापूर जिल्हा यांच्यातर्फे सहकारी संस्थांना प्रशिक्षण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. संस्था सचिवांनी प्रशिक्षण घेऊन त्याचा उपयोग संस्थेच्या प्रगतीसाठी करावा. सभासद व संचालकांनाही माहिती देत प्रशिक्षित करावे, असेही आवाहन त्यांनी केले.
सहकार भारतीने जिल्ह्यातील संस्थांसाठी कोल्हापूरच्या कल्लाप्पाण्णा आवाडे बॅंक सभागृहात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी सहकारी संस्था व आयकर कायदा विषयावर चाटर्ड अकौंटंट सुनील नांगावकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच शंकांचे निरसन केले.
संजय परमणे यांची सिनेट सदस्यपदी, वैशाली आवाडे यांची राज्य बँक फेडरेशन उपाध्यक्षपदी, जवाहर छाबडा यांची राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक तसेच श्रीकांत चौगुले यांची सहकारी विकास सेवा संस्था आदर्श ऑडिट रिपोर्ट मसुदा समितीवर आणि शांताराम भिंगुर्डे यांची जिल्हा पतसंस्था फेडरेशन सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार झाला. प्रमुख पाहुणे ‘रवळनाथ’चे अध्यक्ष एम. एल. चौगुले होते. यावेळी सहकार भारती कोल्हापूरचे अध्यक्ष जवाहर छाबडा, महामंत्री धोंडिराम पागडी, रमेश सोरटे, जयंती देशपांडेंसह पदाधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणाची ७८ संस्थांना मोफत प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रकोष्ठप्रमुख श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.