पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस
पाऊस

पाऊस

sakal_logo
By

जूनमधील कसर भरून काढली
२० टक्के साठा अधिक; राधानगरी धरणात सात हजार क्युसेकने आवक
राधानगरी : सलग आठवडाभराच्या अतिवृष्टीने जूनमधील पावसाची कसर भरून काढल्याने राधानगरी धरणातील साठा गतवर्षीपेक्षा यंदा २२ टक्क्यांनी अधिक झाला आहे. अतिवृष्टीमुळे पाणलोट क्षेत्रातून विसर्गापेक्षा पाण्याची सहा पटीने अधिक आवक असल्याने आज सायंकाळी धरण निम्मे भरले आहे.
यंदा आजमितीस धरणात चार टीएमसी म्हणजे ५० टक्के साठा आहे. गतवर्षी २८ टक्के म्हणजे अडीच टीएमसी होते. गतवर्षी पूरनियंत्रणाच्या नियोजनानुसार धरणातील साठा पावसाळ्यापूर्वीच कमी केला. अवघा दहा टक्के इतकाच साठा शिल्लक ठेवला होता. यंदाही पाणीसाठा कमी करण्यासाठी पावसाळ्यापूर्वीच विसर्ग सुरू केला. जूनमध्ये पाऊसच गायब झाल्याने विसर्ग मर्यादित केला. धरणात यंदा पावसाळ्यापूर्वी गतवर्षीपेक्षा जवळपास २० टक्के अधिक साठा राहिला. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून धरण क्षेत्राबरोबरच पाणलोट क्षेत्रात सलग आठवडाभर अतिवृष्टी झाली. पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढल्याने साठाही झपाट्याने वाढत आहे. तुळशी धरण ४७.१५ टक्के व काळम्मावाडी ३८.३२ टक्के भरले आहे.
सध्या राधानगरी धरणातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद तेराशे क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणात सात हजार क्युसेक आवक आहे. धरणाला वक्राकार दरवाजे नाहीत. त्यामुळे साठा नियंत्रित राखण्यासाठी मर्यादा पडल्या आहेत. आगामी काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास यंदाही धरण जुलैअखेरपर्यंत भरण्याची शक्यता आहे.

जोर कायम
सातव्या दिवशीही तीनही धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी धरण क्षेत्रात १२०, काळम्मावाडी ७३ तर तुळशीत ६० मिलिमीटर पाऊस झाला. दाजीपुरात १६० मिलिमीटर पाऊस झाला.


भोगावतीने नदीकाठ व्यापला
राशिवडे बुद्रुक : परिसरात आज पुन्हा पावसाने जोर धरला. सतत पाऊस कोसळत असल्याने जनजीवन गारठले आहे. उर्वरित भातरोप लावण्यासाठी अंतिम टप्प्यात गती आली आहे. भोगावती नदीचे पाणी पुन्हा पात्राबाहेर दूरवर सरकले आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर थांबण्याचे नावच घेत नसल्याने शिवारातील बांध झोपण्याची संधी शेतकऱ्यांना मिळालेली नाही. परिणामी बांध वाहून जाण्याचे प्रकार वाढले आहेत.

आजऱ्यात जोर; हिरण्यकेशी पात्रालगत
आजरा ः तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. हिरण्यकेशी व चित्रा पात्रालगत वाहत आहेत. काल परिसरात अतिवृष्टी झाली. आजरा पाऊसमापन केंद्रावर ६६४ मिमी पावसाची नोंद झाली होती. यापूर्वी सलग दोन दिवस गवसे परिसरात अतिवृष्टी झाली होती. आजरा तालुक्यात सरासरी ५२.५० मीटर पावसाची नोंद झाली आहे. आजअखेर तालुक्यात ३७२ मिमी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे शेतीकामांना वेग आला आहे. पश्चिम भागात भात रोपलावणीला गती आली आहे. संततधार अशीच राहिल्यास हिरण्यकेशीनदीवरील साळगाव बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

गगनबावडा परिसरात उघडझाप
गगनबावडा : गगनबावडा, सांगशी, सैतवडे परिसरात पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. भात लावणीस वेग आला आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासांत कुंभी धरण पाणलोट क्षेत्रात ६७ मि.मी. तर तालुक्यात आजअखेर सरासरी ११५१ मिमी. पाऊस झाला आहे. कुंभी धरण क्षेत्रात १२४ मि.मी. पाऊस झाला असून, आजअखेर धरण क्षेत्रात एकूण १७२८ मि.मी. पाऊस झाला. कुंभी धरणात ४०.६० द.ल.घ.मी. णीसाठा असून, संचय क्षमतेच्या ५२.८० टक्के भरले आहे. धरणातून ३०० क्युसेक विसर्ग कुंभी नदी पात्रात चालू आहे. कोदे, वेसरफ लघुप्रकल्प यापूर्वीच भरले आहेत.

चांदोलीतून ७१४ क्युसेक विसर्ग
तुरुकवाडी : वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असून, वारणानदीची पातळी झपाट्याने वाढत आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाने थोडी उसंत घेतली होती. दोन दिवस पावसाची सरासरी ३५ मिलिमीटरपर्यंत होती. गेल्या २४ तासांत पाणलोट क्षेत्रात ६५ मिलिमीटर पावसाची नोंद वारणावती प्रर्जन्यमापक यंत्रावर झाली. ३४.४० टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात १५.४४ टीएमसी पाणी आहे. धरण ४४.८९ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रातून १० क्युसेक पाण्याची आवक सुरू असून, ७१४ क्युसेक विसर्ग नदी पात्रात सुरू आहे. कोकरुड-रेठरे दरम्यानचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. कानसा, शित्तूर वारुण परिसरातील वाहतूक तुरुकवाडीमार्गे सुरू आहे.

कासारीच्या पातळीत पुन्हा वाढ
माजगाव ः दोन दिवस पावसाने उसंत घेतल्याने कासारीच्या पातळीत घट झाली होती; पण आज सकाळपासून पुन्हा कासारी पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू झाल्याने नदीच्या पातळीत वाढ होत आहे. सर्वच बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. भात रोप लावण करण्यात शेतकरी व्यस्त आहे.

पाझर तलाव जैसे थे
बोरपाडळे : बोरपाडळेसह परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. शहापूर, माले आणि जाखले तलावाच्या पातळीत वाढ झालेली नाही. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना वैरणीला जाणे मुश्कील झाले आहे. शिवाय लोकांना कामानिमित्त बाहेर पडणे अवघड झाले आहे. कोडोली पोलिस ठाण्यामध्ये नदीकाठच्या गावातील पोलिसपाटलांची बैठक घेऊन सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी दक्षतेबाबत सूचना दिल्या आहेत.

आजरा तालुक्यात तीन घरांची पडझड
आजरा ः आजरा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून, आज तीन घरांची पडझड झाली. सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने पंचनामे सुरू केले आहेत. पेरणोली (ता. आजरा) येथील तुकाराम येसबा हवलदार यांच्या घराची भिंत कोसळली असून, सुमारे वीस हजारांचे नुकसान झाले आहे. हरपवडे (ता. आजरा) येथील पांडुरंग बाबू पोवार यांच्या घराची पडझड झाली असून, सुमारे पन्नास हजारांचे तर चिमणे (ता. आजरा) येथील श्रीरंग शामराव कांबळे यांच्या घरांची भिंत पडली आहे. यामध्ये श्री. कांबळे यांचे वीस हजारांचे नुकसान झाले आहे.


गडहिंग्लजला दिवसभर संततधार
गडहिंग्लज : शहरासह परिसरात आज दिवसभर संततधार सुरूच राहिली. हिरण्यकेशी व घटप्रभा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. नद्या अद्याप पात्राबाहेर पडलेल्या नाहीत. जून महिन्यात कमालीची ओढ दिलेल्या पावसाने बरसायला सुरुवात केली आहे. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये त्यात वाढच झाली आहे. आज दिवसभर संततधार होती. अर्धा-एक तास उसंत घेतल्यानंतर पुन्हा जोरदार सरी कोसळत होत्या. हिरण्यकेशी व घटप्रभा नदीच्या पातळी चार दिवसांत कमालीची वाढ झाली आहे. तालुक्यातील कोणताही बंधारा अद्याप पाण्याखाली गेलेला नाही. पुढील एक-दोन दिवस असाच पाऊस राहिला तर बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चिकोत्रात ४९ टक्के साठा
पिंपळगाव ः भुदरगड तालुक्यातील नागणवाणी (बारवे दिंडेवाडी) प्रकल्प १९.४१ टक्के भरला आहे. आज दिवसभर धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरूच आहे. झुलपेवाडी (चिकोत्रा) प्रकल्पात ४९ टक्के साठा झाला आहे. धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत १०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

६९१०
वारणा पात्राबाहेर
घुणकी : हंगामात पहिल्यांदाच आज दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली. वारणा नदीचे पाणी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले. त्यामुळे नदीवरील विद्युत मोटारी काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. गेले चार दिवस दिवसभर पावसाची रिपरीप असल्यामुळे वारणा नदीची पाणी पातळी वाढून पाणी पात्राबाहेर आले आहे. सलग पाऊस चालू झाल्याने वारणा नदीकाठ धास्तावला आहे.

मौनीसागरमध्ये ५०.१५ टक्के साठा
गारगोटी : भुदरगड तालुक्यात सलग चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. पाटगावच्या मौनीसागर जलाशयात ५०.१५ टक्के साठा झाला आहे. तालुक्यातील काही भागात रोप लावणीचे काम जोमात सुरू आहे. तालुक्यात संततधार पावसामुळे वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून, पूरस्थिती निर्माण होत आहे. कूर, मडिलगे बुद्रुक, वाघापूर परिसरातील नदीकाठावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. पावसामुळे अनेक रस्ते खड्डेमय बनले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04560 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top