पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस
पाऊस

पाऊस

sakal_logo
By

राधानगरी धरणातून ४४५६ विसर्ग कायम
जोर ओसरला; प्रमुख मार्ग खुले; इचलकरंजीत पाणी पातळी फुटाने कमी
सकाळ वृत्तसेवा
राधानगरी, ता. १३ : आज पावसाने उघडीप दिली असली तरी २४ तासांत राधानगरी तालुक्यात अतिवृष्टी कायम राहिली. यामुळे काळम्मावाडी व राधानगरी जलाशयामध्ये पाण्याची आवक वाढत राहिली. परिणामी राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप खुले आहेत. पावसाचा जोर कमी झाल्याने पाचपैकी तीन बंद झाले आहेत. सुरू असलेल्या व वीजनिर्मितीसाठी अशा एकूण ४४५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपत्रात सुरू आहे. धरणस्थळावर १०८ मिमी, तर काळम्मावाडी क्षेत्रावर ७५ मिमी पाऊस झाला असून, हे धरण ८९ टक्के म्हणजे २२.५४ टीएमसी भरले आहे. धरणातून ५८४४ पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

गडहिंग्लज-चंदगड मार्ग खुला
गडहिंग्लज : पावसाचा जोर ओसरल्याने भडगाव पुलावरील पाणी कमी झाले. त्यामुळे गडहिंग्लज-चंदगड मार्ग आज सकाळी साडेसातपासून वाहतुकीस खुला झाला. जरळी बंधाऱ्यावरीलही पाणी कमी झाले आहे. आठ-दहा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू होता. हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने भडगाव पूल गुरुवारी (ता.११) रात्री साडेदहाला पाण्याखाली गेला. त्यामुळे गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. शुक्रवारी (ता.१२) पावसाचा जोर कमी झाला होता. पण, पाणी संथ गतीने कमी होत होते. दरम्यान, आज सकाळी साडेसातला पाणी कमी झाल्याने हा मार्ग वाहतुकीस खुला केला. आज सकाळी जरळी बंधाऱ्यावरील पाणीही उतरले. दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. अशीच परिस्थिती राहिल्यास उद्या हे बंधारे वाहतुकीस खुले होण्याची शक्यता आहे.

इचलकरंजीत दिलासा
इचलकरंजी ः आज दिवसभरात इचलकरंजी पंचगंगा नदीच्या पाण्यामध्ये वाढ न झाल्याने पूरग्रस्त भागामधील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ६७.३ फुटांवर स्थिर राहिली असली तरी पुराचे पाणी अद्याप नागरी वस्तीलगत असल्याने महापालिका आपत्कालीन यंत्रणेचे कर्मचारी तैनात आहेत. नदीची इशारा पातळी ६८ फुटांवर असल्याने महापालिका प्रशासनाने छावण्या सज्ज ठेवल्या आहेत. पंचगंगा नदीची धोका पातळी ७१ फुटांवर आहे.

४३०५८
वादळी वाऱ्यासह
गगनबावड्यात मुसळधार
आठ घरांची पडझड; ऐन पावसाळ्यात कुटुंबे उघड्यावर

गगनबावडा, ता. १३ ः तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी सुरू असून, अनेक घरांची पडझड झाली. ऐन पावसाळ्यात कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. गेल्या आठवड्यात नऊ घरांची पडझड होऊन सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले होते. या दोन दिवसांत पाच घरे व तीन गोठ्यांची पडझड होऊन जवळजवळ दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
सांगशी येथील मधुकर श्रीपती चव्हाण यांची घराची भिंत व गोठा जमीनदोस्त झाला. त्यांचे जवळपास ७० हजारांचे नुकसान झाले आहे. तळये येथील हिंदुराव भाऊ चव्हाण यांच्या घरावर झाड पडल्याने भिंत व पत्र्याची पाने फुटून २० हजारांचे नुकसान झाले. गारिवाडे येथील दशरथ दगडू कदम यांचा गोठा पडून २० हजारांचे नुकसान झाले. प्रकाश रामचंद्र पडवळ (खोकुर्ले), लहू धोंडिराम पाटील (असळज), बाळू लक्ष्मण बोडेकर (बावेली), श्रीरंग लहू पाडावे (गारिवडे) व गणपती बाबाजी जिनगरे (गारिवडे) यांच्या घराच्या व गोठ्याच्या भिंती कोसळून नुकसान झाले आहे.
दरम्यान, कुंभी धरणाच्या वक्राकार दरवाजातून ६०० क्युसेक विसर्ग वाढविल्याने एकूण ९०० क्युसेक इतका विसर्ग चालू आहे. कुंभी धरण ९१ टक्के भरले असून, पाणीसाठा ७०.११ दलघमी इतका झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04641 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..