पर्यटन विकास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटन विकास
पर्यटन विकास

पर्यटन विकास

sakal_logo
By

राधानगरीच्या पर्यटन विकासासाठी आर्थिक तरतुदीची गरज

पर्यटन नगरी बनविण्याच्या पालकमंत्र्यांच्या घोषणेमुळे समाधान

मोहन नेवडे, सकाळ वृत्तसेवा
राधानगरी ता. ६ : पर्यटन विभागाने राधानगरी तालुका ''विशेष पर्यटन क्षेत्र''म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित केले असतानाच आता राधानगरीला पर्यटन नगरी बनविण्याच्या पालकमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा राधानगरीच्या पर्यटन क्षेत्र विकासासाठी एक शुभ संकेतच ठरणारी आहे. मात्र, अधिक सजगतेने नियोजनबद्धतेने कार्यवाही झाली, तरच पालकमंत्र्यांची घोषणा प्रत्यक्ष कृतीत येणार आहे. राधानगरी पर्यटन विकासाबाबत ‘सकाळ’ने सातत्याने पाठपुरावा केला. आता याला चालना मिळणार असल्याने ‘सकाळ’च्या प्रयत्नांना यश येत आहे.
आमदार प्रकाश आबिटकर यांनी राधानगरीच्या पर्यटन विकासावर भर देऊन, राधानगरी-दाजीपूर अभयारण्य क्षेत्र पर्यटन विकास आराखड्याला मंजुरी मिळवली. त्या पाठोपाठ राधानगरी धरण क्षेत्र पर्यटन विकास आराखडा जिल्हा नियोजन मंडळाकडे मंजुरीसाठी सादर झाला आहे. अभयारण्य आणि धरणक्षेत्राच्या प्रस्तावित पर्यटन विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी भरीव आर्थिक तरतुदीसाठी पालकमंत्र्यांनी आश्वासक पाऊल उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे. वेळीच आर्थिक तरतूद झाली. तरच पर्यटन विकासाचा आलेख वाढता राहणार आहे. सद्य:स्थितीत पर्यटन उद्योगावर तालुक्याची भिस्त आहे.
पालकमंत्र्यांच्या घोषणेनुसार राधानगरी पर्यटन नगरी झाल्यास, पर्यटन उद्योग उभारी घेणार आहे. पर्यटन आधारित अर्थव्यवस्था निर्माण होऊन, रोजगारनिर्मितीची क्षमता वाढणार आहे. पालकमंत्र्यांची घोषणा राधानगरीच्या पर्यटन विकासाला राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ देणारी आणि भविष्यात पर्यटन उद्योग वाढीस सहाय्यभूत देणारीच ठरेल. मात्र, त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा करावा लागणार आहे. दर्जेदार गुणवत्तापूर्ण दर्जेदार पायाभूत सुविधा, व्यापक प्रभावी वाहतूक व्यवस्था प्राधान्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आर्थिक तरतूद झालेल्या ‘हत्ती सफारी’, राधानगरी धरण स्थळावर शाहू महाराजांच्या कार्याचा जीवनपट उलघडणाऱ्या‍ ‘व्ह्यू पॉईंट’चे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
.....

हॉलिडे रिसॉर्ट योजना अपूर्णावस्थेत
राधानगरी-दाजीपूरच्या पर्यटन विकासात मैलाचा दगड ठरणारी दाजीपुरातील ‘हॉलिडे रिसॉर्ट योजना’ तब्बल पाच वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. अंतिम टप्प्यात आलेल्या योजनेचे केवळ ३० टक्के काम बाकी आहे. बाकी कामांचा सुधारित आराखडा-अंदाजपत्रकही मंजूर झाले आहे. दिवाळीनंतर बाकी काम सुरू करण्याचा वायदा एमटीडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांनी केला होता. प्रत्यक्ष आजतागायत काम सुरू करण्यास मुहूर्त सापडलेला नाही.