‘होम स्टे’ उभारणीसाठी अनुदान योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘होम स्टे’ उभारणीसाठी अनुदान योजना
‘होम स्टे’ उभारणीसाठी अनुदान योजना

‘होम स्टे’ उभारणीसाठी अनुदान योजना

sakal_logo
By

‘होम स्टे’ उभारणीसाठी अनुदान योजना
---
‘वन्यजीव’कडून प्रस्ताव; राधानगरी अभयारण्य क्षेत्रात रोजगार निर्मितीचा उद्देश
मोहन नेवडे : सकाळ वृत्तसेवा
राधानगरी, ता. ६ : राधानगरी अभयारण्य क्षेत्रात निसर्ग पर्यटनाला चालना आणि स्थानिक लोकांना रोजगार निर्मितीच्या उद्देशाने वन्यजीव विभाग आता ‘होम स्टे’ उभारणीसाठी आर्थिक पाठबळ देणार आहे. खासगी जमिनीवर ‘होम स्टे’ उभारणीसाठी स्थानिकांना अनुदान देण्याची योजना अभयारण्य पर्यटन विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली.
पर्यटकांना किफायतशीर निवास व भोजन व्यवस्था निर्माण होण्यासाठी आगामी पाच वर्षांत शंभर ‘होम स्टे’ उभारण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले आहे. या पुढील काळात स्थानिकांनी ‘होम स्टे’ बांधणी केली, तर प्रति ‘होम स्टे’ तीन लाख रुपयांचे अनुदान संबंधितांना मिळेल. पर्यटन विकास आराखड्यात अनुदानासाठी तीन कोटी रुपयांचा खर्च अंदाजित धरण्यात आला आहे. अभयारण्य पर्यटन विकासाच्या साडेसतरा कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यास राज्य निसर्ग पर्यटन विकास मंडळाने मंजुरी दिली.
पहिल्या टप्प्यातच ‘होम स्टे’ अनुदान योजनेच्या अंमलबजावणीचे संकेत आहेत. मंडळाने ‘होम स्टे’ अनुदानासाठी ३० लाख रुपयांच्या तरतुदीची शिफारस केली. प्रस्तावित आराखड्यातील गृह पर्यटनात पर्यटकांना निवास व भोजन सुविधेसाठी अभयारण्य क्षेत्रात प्रत्येक गावात किमान दोन पर्यटक निवासस्थानांची संकल्पना आहे. या गावात ग्राम परिस्थितीकीय विकास समित्या स्थापन झाल्या. पर्यटक निवास स्थान ‘होम स्टे’ बांधण्यास स्थानिकांनी प्रवृत्त होण्यासाठी अनुदान फंडा शोधण्यात आला आहे. अनुदान योजनेची नियोजनपूर्वक कार्यवाही सुरू झाल्यास अभयारण्य क्षेत्रातील स्थानिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल. पर्यटकांसाठी खात्रीची, सुरक्षित निवास व भोजन व्यवस्था निर्माण होईल.
-----------
चौकट
पर्यटकांचा वाढेल ओघ
दरम्यान, सर्व सुविधांयुक्त ‘होम स्टे’ पर्यटन व्यवसायाच्या बरकतीला आणि पर्यटकांचा ओघ वाढीस सहाय्यभूत ठरेल. मात्र, अद्याप ‘होम स्टे’ अनुदानासाठीचे निकष किंवा अटी-शर्ती याची स्पष्टता वन्यजीव विभागाकडून झालेली नाही. केवळ मंजुरी आणि आर्थिक तरतुदीची शिफारस या टप्प्यावरच आहे.