
भोगावती कारखान्याने शिव महोत्सव
03266
भोगावती : शिवछत्रपतींची पालखी वाहताना आमदार पी. एन. पाटील, उदयसिंह पाटील व संचालक.
भोगावती कारखान्यात शिव महोत्सव
राशिवडे बुद्रुक : मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके ‘शिवाजी महाराजांचा जयघोष’ भगव्या पताका आणि तब्बल तीन किलोमीटर मिरवणूक अशा शिवमय वातावरणात भोगावती साखर कारखान्याने शिव महोत्सव साजरा केला. रयतेसाठी आयुष्य वेचलेल्या या राजांचा हा सोहळा लोकोत्सव व्हावा, असे प्रतिपादन आमदार पी. एन. पाटील यांनी या वेळी केले. उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
कुरुकली (ता. करवीर) येथून परिसरातील विविध माध्यमिक शाळा भोगावती महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्या ताफ्यांनी मिरवणुकीला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा खांद्यावर घेऊन सुरू झालेल्या या मिरवणुकीत दांडपट्टा, मर्दानी खेळ, लेझीम, झांजपथक सहभागी होते. या वेळी कार्यकारी संचालक संजय पाटील, सर्व संचालक, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, परितेचे सरपंच मनोज पाटील, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील उपस्थित होते. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयसिंगराव हुजरे यांनी आभार मानले. प्रा. पवन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, राशिवडे येथील मध्यवर्ती असलेल्या गाव तलावामध्ये उभारलेल्या चौथऱ्यावर शिवजयंती साजरी केली. परिसरातील येळवडे, पुंगाव, शिरगाव परिसरासह राधानगरी तालुक्यात गावागावांत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली. अनेक ठिकाणी गडकिल्ल्यांवरून शिवज्योती आणून मिरवणुकीही काढल्या.