
भोगावती निवडणूक शक्यता
‘भोगावती’च्या
निवडणुकीची
शक्यता
राशिवडे बुद्रुक, ता. १९ : भोगावती सहकारी साखर कारखान्यासह लांबलेल्या सर्व कारखान्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया या आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ज्या साखर कारखान्याच्या संचालक मंडळांची मुदत संपली आहे. अशा कार्यकारी संचालकांची बैठक बुधवारी (ता. २२) प्रादेशिक सहसंचालकांनी बोलावली आहे. या बैठकीनंतर लगेचच निवडणूक कार्यक्रम लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २४ एप्रिल २०२२ रोजी संपली आहे. कोरोनामुळे सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया लांबल्याने या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या कुंभी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर या कारखान्याची निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता सहकार सहसंचालक कार्यालयाने येत्या बुधवारी कार्यकारी संचालकांची बैठक बोलावल्याने लवकरच निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
भोगावती बरोबरच सदाशिवराव मंडलिक, हमीदवाडा आणि दूधगंगा बिद्री या निवडणूक कार्यक्रम ही लागू शकतो. सध्या भोगावती साखर कारखान्यावर आमदार पी. एन. पाटील यांची सत्ता आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित होताच लगेचच या प्रक्रियेला गती येण्याची शक्यता आहे. याबाबत भोगावती कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील म्हणाले, ‘ज्या साखर कारखान्यांच्या निवडणुका लांबल्या आहेत. त्या सर्व कारखान्याच्या कार्यकारी संचालकांची बैठक बुधवारी (ता. २२) प्रादेशिक सहसंचालकांनी बोलावली आहे. यात निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा होईल ही शक्यता आहे.’