
वाहतूक बंद
मोऱ्या पुनर्बांधणीसाठी वाहतूक अन्य मार्गे वळविणार
राधानगरी-दाजीपूर मार्ग : सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रस्ताव
राधानगरी ता. २७ : कलवट (मोऱ्या) पुनर्बांधणी कामातील रहदारीचा अडथळा दूर करण्यासाठी राधानगरी-दाजीपूरपर्यंतच्या राज्य मार्गावरील वाहतूक लवकरच बंद करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने आखले आहे. तसा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर कोल्हापूर-राधानगरी दाजीपूरमार्गे तळ कोकण व गोवा राज्याकडे होणारी अवजड वाहनांची वाहतूक अन्य मार्गे वळविण्यात येणार आहे. तर हलक्या व प्रवासी वाहनांच्या वाहतुकीसाठी राधानगरी-पडळी-पिरळ पूल-कारीवडे- वलवण-दाजीपूर हा पर्यायी मार्ग राहणार आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापासून वाहतूक व्यवस्थेतील बदलाची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली. किमान पुढील तीन महिने राधानगरी-दाजीपूर मार्गावरून तळ कोकण व गोवा राज्याकडे होणारी वाहतूक बंद राहणार आहे. या कालावधीत या मार्गावरील जवळपास ३७ कलवट आणि पठाण पुलाच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मुळातच फेजिवडेपासून कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सरहद्दीवरील दाजीपूरपर्यंतचा ३० किलोमीटरचा राज्यमार्ग अरुंद आहे.
या मार्गाच्या रुंदीकरणासाठी वन्यजीव विभागाची हरकत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या राज्य मार्गाचे रुंदीकरण करता येणार नसल्याने, केवळ अरुंद धोकादायक स्थितीतील कलवटचे रुंदीकरण होणार आहे. याचवेळी कलवट पुनर्बांधणी कामात वाहनांच्या रहदारीचा अडथळा निर्माण होणार आहे. कलवट पुनर्बांधणी निश्चित वेळेत होण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूकबंदी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्तावाला मंजुरी वाहतूक बंदीची नोटीस जारी होईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली.